सचिन काकडे
माणसांच्या जीवनशैलीत जसा बदल होत गेला तसाच सौंदर्य जोपासण्याकडे समाजाचा कलही वाढत गेला. समाजाची हीच गरज ओळखून साताऱ्याच्या राहणाऱ्या अभिजीत इंगळे यांनी महिलांची मक्तेदारी मोडून काढत चक्क ब्युटी पार्लर क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ते साताऱ्यात स्वतःचे ब्युटी पार्लर चालवत असून, आज त्यांच्याकडे यशस्वी ब्युटीशियन म्हणून पाहिले जात आहे.
ब्युटी पार्लर आणि महिला यांचे जवळचे नाते आहे. या क्षेत्रात आजही महिलांचीच मक्तेदारी आहे. ही मक्तेदारी मोडून काढत आज अनेक पुरुषांनी याच क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण करून स्वतःचे करिअरदेखील घडविले आहे. अभिजीत यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथे झाले. आपण काही तरी वेगळे करावे असे त्यांना नेहमीच वाटत होते. त्यामुळेच त्यांनी ब्युटी पार्लर क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला. लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्याला जे आवडते ते आपण करावे ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. त्यामुळेच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर एबीडीसी सीडेस्को, ट्रायकॉलॉजी या परीक्षा उत्तीर्ण होऊन ब्युटी पार्लर क्षेत्रात पाऊल टाकले. काही काळ जेन्ट्स पार्लर चालविल्यानंतर अभिजीत यांनी स्वतःचे लेडीज ब्युटी पार्लर सुरू केले. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी साताऱ्यात सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आजही अविरतपणे सुरू आहे.
ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलेला उत्तम सेवा मिळावी यासाठी अभिजीत यांनी एक स्वतःचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसारच ते ब्युटी ट्रीटमेंट देण्याचे काम करतात. हेअरकट, हेअरस्टाइल, आयब्रो, हेअर रिमूव्हल, व्हॅक्सिंग. फेशियल, मेनिक्युअर, पेडीक्युअर अशा अनेक ब्युटी ट्रीटमेंटमध्ये आज अभिजीत यांचा हातखंडा झाला आहे. आज साताराच नव्हे तर पुणे मुंबई अशा मोठ्या शहरातील गृहिणी, विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या नोकरदार महिला इतकेच काय तर सिने कलावंत यांना देखील त्यांनी उत्तम दर्जाचे ब्युटी ट्रीटमेंट दिले आहे व आजही देत आहेत. त्यांच्या या कार्यात पत्नीचेही मोलाचे योगदान मिळत आहे. आपल्या सौंदर्याची वाहवा व्हावी, इतरांपेक्षा आपले व्यक्तिमत्त्व वेगळे असावे अथवा तसे ते दिसावे, ते सर्वांमध्ये खुलून दिसावे असे वाटणारी प्रत्येक व्यक्ती आज अभिजीत यांच्या ब्यूटी पार्लरचा धागा बनली आहे.
(कोट)
हे क्षेत्र महिलांचे ते पुरुषांचे असे काहीच नसते. आपल्याकडे जर कला असेल आणि काही तरी करण्याची जिद्द असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात आपले करिअर करू शकतो.
– अभिजीत इंगळे, सातारा
*फोटो येणार आहे.