वाठार स्टेशन : पाडळी स्टेशन -सातारारोड (ता. कोरेगाव) वाॅर्ड क्रमांक १ मधील महिला व मतदारांनी येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
पाडळी स्टेशन येथील जरंडा वाॅर्ड नंबर एकमध्ये गेली अनेक वर्षे झाली, नागरिकांना विविध प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. मुख्य म्हणजे, गावातील रस्ता, दिवाबत्ती, गटारे, सार्वजनिक शौचालय, पिण्याचे पाणी या प्रमुख समस्या आहेत. गेली अनेक वर्षे झाली ; पण गावकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात ग्रामपंचायत, सरपंच व लोकप्रतिनिधींना यश आले नाही. विकासाच्या नावाखाली फक्त चर्चा झाली; पण गावापासून विकास खूपच लांब राहिला. येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. वारंवार मागणी करूनही या समस्येकडे कुणीही लक्ष दिले नाही. म्हणून, या वाॅर्डमधील महिला व मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आमच्या सर्व मागच्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, असे महिलांनी ठणकावून सांगितले आहे. महिलांच्या या निर्णयामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. याचा धक्का या वाॅर्डातील उमेदवारांना बसला आहे.