फलटण : ‘सर्वांगीण विकासासाठी अवांतर वाचन महत्त्वाचे आहे. भावविश्व समृद्ध होण्याबरोबरच ज्ञानकक्षा रुंदावण्यासाठी मुलांना वाचनाची गोडी लावणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रथम बुक्सची पुस्तक भेट महत्त्वाची आहे,’ असे मत निंबळक केंद्रसमूहाचे केंद्रप्रमुख दारासिंग निकाळजे यांनी व्यक्त केले.
बंगळुरू येथील प्रथम बुक्स या संस्थेकडून निंबळक केंद्रशाळेला गोष्टींची पुस्तके भेट मिळाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास भोईटे यांच्या हस्ते पुस्तकांचा स्वीकार करण्यात आला. यात उत्कृष्ट दर्जाची रंगीत चित्रमय आणि वाचनीय अशी ६१ पुस्तके आहेत.
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग, प्रथम बुक्स, युनिसेफ यांच्यावतीने आयोजित ‘गोष्टींचा शनिवार’ या विद्यार्थीप्रिय उपक्रमासाठी याच पुस्तकांचा वापर केला जातो.
‘शाळा सुरू झाल्यावर ही पुस्तके प्रत्यक्ष हातात घेऊन वाचणे मुलांसाठी खूप आनंददायी असेल,’ असे मत मुख्याध्यापक शारदा निंबाळकर यांनी व्यक्त केले.
रवींद्र जंगम यांनी स्वागत करून प्रथम बुक्स संस्थेच्या डोनेट अ बुक योजनेबाबत माहिती दिली. यावेळी प्रशांत बिरादार, परमेश्वर कांबळे, जितेंद्र कदम, रुपाली धुमाळ, भारती महामुनी यांची उपस्थिती होती.
फोटो जगदीश कोष्टी यांनी मेल आहे...
निंबळक शाळेस संस्थेतर्फे पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख दारासिंग निकाळजे, रवींद्र जंगम, शारदा निंबाळकर, प्रशांत बिराजदार उपस्थित होते.