लोणंद : महाबळेश्वरच्या वेण्णा लेक व सारोळ्याच्या नीरा नदीतील सुरू असलेल्या बोटिंग क्लबच्या धर्तीवर खंडाळा तालुक्यातील धावडवाडीतील साक्री पाझर तलावात बोटिंग (नौकानयन) सुरू करून पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी खंडाळा पंचायत समिती सभापती रमेश धायगुडे-पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. खंडाळा तालुक्यात धावडवाडी हद्दीत यादववस्तीनजीक साक्री पाझर तलाव असून, हा हरळी डोंगररांगेचा निसर्गरम्य परिसर आहे. तलावात वर्षभर पाणीसाठा असतो. आजही ऐन उन्हाळ्यात सुमारे ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. तलावाचे काम १९७८ मध्ये सुरू होऊन १९८४ मध्ये पूर्णत्वास गेले. साठवण क्षमता ५. १३ द. ल. घ. फूट इतकी आहे. धोम-बलकवडी कालव्यामुळे तलावातील पाणीपातळी कमी होत नाही. याचाच लाभ घेण्याची कल्पना खेड बु।। पंचायत समिती गणाचे सदस्य व पंचायत समितीचे सभापती रमेश धायगुडे-पाटील यांच्या मनात आली. या तलावात बोटिंग झाल्यास या भागातील पर्यटन विकासाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधी निर्माण होतील. धावडवाडी पाझर तलावास सभापती धायगुडे यांनी पत्रकारांसह भेट देऊन बोटिंग क्लब व पर्यटन विकासाची कल्पना मांडली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी चंद्रशेखर म्हेत्रे, विस्तार अधिकारी जमदाडे, ल. पा. चे. उपअभियंता आर. व्ही. धोत्रे, सरपंच आरफीन पटेल, राजेंद्र जानकर, शांतीलाल दशरथे उपस्थित होते. रमेश धायगुडे यांच्या कल्पनेला आमदार मकरंद पाटील यांनी सर्वतोपरी सहकार्य केल्यास धावडवाडीचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. (वार्ताहर) रामराजे, पाटील यांचे सहकार्य घेणार धावडवाडी येथील साक्री पाझर तलावात बोटिंगची सोय करून पर्यटन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगार व पर्यटन असा दुहेरी लाभ होणार आहे. यासाठी रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांचे सहकार्य घेणार आहे. ही कल्पना यशस्वी करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. - रमेश धायगुडे-पाटील
दुष्काळी भागात चक्क ‘बोटिंग’
By admin | Updated: June 9, 2015 00:12 IST