कऱ्हाड: हातात झाडू घेऊन शहर स्वच्छ करण्यात मग्न असणाऱ्या कराड पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हातात सध्या पाटी आणि पेन्सिलही दिसत आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या कराड पालिकेने आता निरक्षर स्वच्छता कर्मचाऱ्यांना साक्षर बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे .मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सध्या सुरू आहे. कऱ्हाड पालिकेत सध्या चतुर्थश्रेणी कर्मचारी निरक्षर आहेत, त्यांच्यासाठी या साक्षरता वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्यात विशेषत: आरोग्य विभागात दैनंदिन स्वच्छतेची कामे करणाऱ्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे शिक्षण कमी प्रमाणात झालेले दिसते तर काहींनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. या कर्मचाऱ्यांना पगार पत्रकावर सह्या करणे, बँकेतील कामांमध्ये अडचणी येत आहेत. अशा कर्मचाऱ्यांसाठी पालिकेने साक्षरता वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्याला मूर्त स्वरूपही दिले आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांना शिकवण्याचे काम पालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे उच्चशिक्षित कर्मचारी माणिक बनकर हे सध्या करीत आहेत. पालिकेत सुरू असणाऱ्या या साक्षरता वर्गाला चाळीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसत आहे. यातील काहींनी शाळेत पायही ठेवलेला नाही तर काहींनी जेमतेम शिक्षण घेतलेले आहे. या सर्वांना साक्षर करण्याचा संकल्प मुख्याधिकारी डाके यांनी केला असून माणिक बनकर यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
कोट
निरक्षर असल्याने घरात आणि कामाच्या ठिकाणी हेटाळणी होत असते. त्यामुळे मुख्याधिकारी डाके यांनी साक्षरता वर्गाची अभिनव संकल्पना राबवली आहे. माझे शिक्षण लक्षात घेऊन माझ्यावर शिकवण्याची जबाबदारी त्यांनी विश्वासाने दिली असून मी प्रामाणिकपणे ते काम करणार आहे. कर्मचारी साक्षर होईल तोपर्यंत हे वर्ग सुरू ठेवणार आहे.
-माणिक बनकर
पाणी पुरवठा विभाग
चौकट:
कराड पालिकेने राबवलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सध्या शहरभर कौतुक होत आहे. नागरी स्वच्छता अभियानामधील कामगिरीमुळे कराडने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. यामध्ये कर्मचारी वर्गाचे मोठे योगदान आहे. त्या कर्मचाऱ्यांना साक्षर करण्यासाठी पालिकेने चालविलेले प्रयत्न कौतुकास्पदच आहेत.
फोटो :03 kd 01
फोटो ओळ:
कराड पालिकेच्या साक्षरता वर्गात सहभागी झालेले कर्मचारी.