सातारा : ‘भारतीय जनता पक्षाने पेरलेला राजकीय बॉम्ब शनिवार, दि. २१ रोजी मोठा विस्फोट घडविण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अनिल देसाई कार्यकर्त्यांसोबत म्हसवड येथे भाजपमध्ये डेरेदाखल होणार आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील जवळपास १२ आजी-माजी सदस्य भाजपमध्ये दाखल होतील,’ असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केला आहे. किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे मावळचे माजी खासदार गजानन बाबर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत दाखल झाले. माण तालुक्यातील अनिल देसाई यांच्यासह त्यांचे समर्थक कार्यकर्ते शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत म्हसवड बाजार पटांगणावर सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात देसाई यांचा भाजप प्रवेश सोहळा होणार आहे. ‘सदाशिवतात्यांच्या अपयशाचे खापर पक्षाने माझ्यावर फोडले. तसेच काही लोकांच्या वारंवार माझ्याविरोधात कुरघोड्या सुरू होत्या. त्यामुळे हे सहन न झाल्यानेच राष्ट्रवादी सोडत आहे,’ अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली.जिल्हा परिषदेचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने अविश्वास ठराव आणला होता, त्यामुळे पक्षाशी फारकत घेऊन ते भाजपमध्ये गेले. त्यांच्या पाठोपाठ आता देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांचाही प्रवेश होणार असल्याने राष्ट्रवादीसाठी ही धक्कादायक बाब ठरली आहे.अजून मी राष्ट्रवादीसोबतच : कदमजावळी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य अमित कदम यांना भाजपकडून पक्ष प्रवेशाची ‘आॅफर’ आली असून, कदम गट धक्कादायक निर्णय घेण्याच्या वळणावर येऊन ठेपला आहे. मात्र, अमित कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘अद्याप मी कोणताही निर्णय घेतला नसून सध्या तरी मी राष्ट्रवादी पक्षासोबतच आहे.’
भाजपचा शनिवारी राजकीय बॉम्ब!
By admin | Published: January 19, 2017 12:01 AM