सातारा : शहरातील हातगाडीधारक व फळविक्रेत्यांच्या बायोमेट्रिक सर्व्हेचा दुसरा टप्पा नुकताच सुरू झाला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या नागपूर येथील खासगी संस्थेमार्फत सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले असून, गेल्या आठ दिवसांत १५० तर आतापर्यंत ५५० हातगाडीधारकांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे.
फळविक्रेते व हातगाडीधारकांचा बायोमेट्रिक सर्व्हे करण्यात यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व नगर पंचायतींना दिले आहेत. सर्वधर्मीय सुशिक्षित बेरोजगार हॉकर्स संघटनेच्या वतीने सर्व्हेसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. यानंतर जिल्ह्यातील रहिमतपूर व महाबळेश्वर पालिकेकडून सर्व्हेचे काम पूर्ण करण्यात आले; परंतु सातारा पालिकेकडून ठोस निर्णय घेतला जात नव्हता. अखेर लॉकडाऊनपूर्वी सर्व्हेचा पहिला टप्पा सुरू झाला.
पहिल्या टप्प्यात शहरातील सुमारे ४०० हातगाडीधारकांचा सर्व्हे करण्यात आला. कोरोनामुळे वर्षभरापासून थांबलेले हे काम पुन्हा एकदा सुरू झाले आहे; मात्र तांत्रिक अडचणींमुळे दैनंदिन नियोजनापेक्षा कमी हातगाडीधारकांचाच सर्व्हे होत आहे. गेल्या आठ दिवसांत विविध ठिकाणच्या १५० हातगाडीधारकांचा पथकाकडून सर्व्हे करण्यात आला. सातारा शहरात फळविक्रेते व हातगाडीधारकांची संख्या ६४० इतकी आहे; मात्र ज्यांनी शासनाच्या स्वनिधी योजनेचा लाभ घेतला आहे, अशा हातगाडीधारकांचा देखील पालिकेकडून सर्व्हे केला जाणार आहे. जोपर्यंत सर्व्हे पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार आहे.
(कोट)
ज्या हातगाडीधारकांनी आपला मोबाइल क्रमांक आधार कार्डला लिंक केलेला नाही, अशा हातगाडीधारकांची ऑनलाइन नोंदणी होत नाही. त्यामुळे संबंधितांनी तातडीने मोबाइल क्रमांक आधारला लिंक करावा. हातगाडीधारकांचे हातावरचे पोट आहे. ज्यांचा सर्व्हे झाला आहे, अशा हातगाडीधारकांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करू नये.
- संजय पवार, शहराध्यक्ष
सर्वधर्मीय सुशिक्षित बेरोजगार हॉकर्स संघटना