कोरेगाव : गेल्या दीड वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले स्वच्छतागृह सुरू करण्यासाठी कोरेगावकरांनी सोमवारी भीक मांगो आंदोलन केले.
याबाबत माहिती अशी की, नगरपंचायतीने स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत मिळविलेल्या बक्षीस रकमेतून सुमारे ३० लाख रुपये तरतूद असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीसाठी पुण्याच्या एका ठेकेदार कंपनीला डिसेंबर २०१८ मध्ये काम दिले होते. हे काम हाती घेत असताना साखळी पुलाजवळील जुने स्वच्छतागृह पाडण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती.
ठेकेदार कंपनीने स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करून दीड वर्ष झाले तरी नगरपंचायत प्रशासनाने काही तांत्रिक बाबीमुळे ते खुले केले नाही. परिणामी, नागरिकांमधून वारंवार तक्रारी येत होत्या.
सोनेरी ग्रुपने ८ फेब्रुवारीला स्वच्छता गृहाच्या दारात उपोषणाला बसून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी चार दिवसांत स्वच्छतागृह सुरू करण्याचे अभिवचन नगरपंचायतीने दिले होते; मात्र पुन्हा महिना उलटूनही केवळ प्रोत्साहन निधी नसल्याचे कारण देत प्रशासन नागरिकांना झुलवत असल्याचे लक्षात आल्यानंतर सोनेरी ग्रुपने सोमवारी नगरपंचायतीला प्रोत्साहन निधी मिळवून देण्यासाठी चक्क शहरात फिरून भीक मांगो आंदोलन करत नगरपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला.
नगरपंचायत कार्यालयापासून जानाई, कापडपेठ, बुरुडगल्ली, रामलिंग नगर मार्गे, जुना स्टँडवरून हे भीक मांगो आंदोलन शेवटी साखळी पुलाजवळील स्वच्छतागृहाच्या दारात संपले. लोकशाही मार्गाने झालेल्या या आंदोलनात सोनेरी ग्रुप, सोनेरी सखी मंच, कोरेगाव नगर विकास कृती समितीचे सदस्य सहभागी झाले होते.
मुख्याधिकाऱ्यांनी पाठवले पत्र
साखळी पुलाजवळील स्वच्छता गृह सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला देणे बाकीची पूर्तता कशी करावी, यासाठी नगरपंचायतीने राज्याच्या स्वच्छता अभियान संचालकांना पत्र पाठवले आहे, त्यांचा निर्णय आल्यानंतर स्वच्छतागृह सुरू केले जाईल, असे पत्राद्वारे आंदोलकांना कळविले आहे.