पंकज भिसे - विद्यानगर येथील महाविद्यालयांच्या बसथांब्यावर शेकडो विद्यार्थी बसची वाट पाहत थांबलेले असतात. काही वेळानंतर मसूर-काले ही कऱ्हाडला येणारी बस याठिकाणी पोहोचते; पण विद्यार्थ्यांची गर्दी पाहून चालक मुद्दाम थांब्यापासून काही अंतरावर जाऊन बस थांबवतात. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना धावपळ करीत बसपर्यंत जावे लागते. विद्यानगर येथे वेणुताई चव्हाण महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, गाडगे महाराज कला, वाणिज्य, शास्त्र महाविद्यालय, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय आदी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांच्या विविध शाखांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संबंधित विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. या विद्यार्थ्यांना कॉलेजवर जाण्यासाठी कऱ्हाड बसस्थानकातून जावे लागते. कऱ्हाड बसस्थानकातही वेळेवर बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसात होते. त्यातच महाविद्यालयाच्या थांब्यावर बस थांबतच नसल्याने विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास उशीर होतो.वेणुताई चव्हाण महाविद्यालयासमोर बसथांबा आहे. त्या थांब्यावर यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय व वेणुताई चव्हाण महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी कऱ्हाडला जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेले असतात. विद्यार्थ्यांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळते. ही गर्दी पाहिल्यानंतर चालक याठिकाणी बस थांबवतच नाहीत. थांब्यापासून काही अंतर पाठीमागे किंवा पुढे चालक बस थांबवतात. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींची बसमध्ये जाण्यासाठी धावपळ सुरू होते. या धावपळीतच धक्काबुक्कीचे प्रकार घडतात. त्यामुळे त्यांना दुखापती झाल्याच्या तसेच काहीवेळा पळापळीत युवती पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मुळात हा रस्ता गर्दीचा असूनही येथे गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग जास्त असतो. अशातच रस्त्यावर होणारी धावाधाव त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसमध्ये चढताना होणाऱ्या धक्काबुक्कीवेळी विद्यार्थ्यांचे पाय बसच्या चाकाखाली सापडणे किंवा दुसऱ्या वाहनाची धडक बसणे असे प्रकार येथे वारंवार घडत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीविताशी सुरू असलेला हा खेळ थांबण्यासाठी बस थांब्यावर कऱ्हाड आगाराने वाहतूक नियंत्रक नेमणे गरजेचे आहे. तसेच यावेळी मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मसूरहून येणारी बस याठिकाणी थांब्यावरच थांबविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. पाससाठीही होते ससेहोलपटविद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातच शैक्षणिक प्रवास सवलत पास देण्याचा उपक्रम कऱ्हाड आगाराने यापूर्वी हाती घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास काढणे सोयीचे होत होते. सध्या मात्र पास काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला कऱ्हाड बसस्थानकात यावे लागते. मसूरसह शामगाव भागातील विद्यार्थी खास पास काढण्यासाठी कऱ्हाडमध्ये जातात. त्यातून त्यांना रिक्षाचाही भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच पास कक्षात असणारे कर्मचारी वेळेत त्याठिकाणी उपस्थित नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसानही होते. थांब्यावर जास्त विद्यार्थी नसतील तर चालक बस थांब्यावर थांबवितात. मात्र, जास्त गर्दी दिसली तर चालक थांब्यापासून काही अंतरावर जाऊन बस थांबवतात. एकतर आम्हाला घरी जायला उशीर झालेला असतो. त्यामुळे मिळेल ती बस पकडण्यासाठी विद्यार्थ्यांची धावाधाव होते. हा प्रकार जीवघेणा आहे.- प्रथमेश पाटील, विद्यार्थी, कऱ्हाड
बसथांबा एकीकडं..बस थांबते दुसरीकडं !
By admin | Updated: March 16, 2015 00:15 IST