लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : सलग सुट्ट्यानंतर बँका उघडल्याने पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी वडूजमधील बहुतांशी बँकांत ग्राहकांची गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सचा पुरता बोजवारा उडत असल्याचे चित्र आहे, तर याबाबत ग्राहक बेजबाबदार तर संबंधित बँक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावरून बँकेत व एटीएमजवळ कोरोनाची धास्तीच उरलीच नाही, असेच स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तरीही नागरिक गंभीर होताना दिसून येत नाहीत. वडूजमध्येही अशीच स्थिती आहे. बहुतांशी बँकांच्या ठिकाणी गर्दी असते. सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाला आहे. संबंधित बँक प्रशासनही गांधारीच्या भूमिकेत वावरत असल्याचे दिसून येत आहे. तर नगरपंचायत प्रशासनही फक्त विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक तसेच रात्री आठनंतर सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात मग्न असल्याचे चित्र आहे.
खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात बाहेरून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर सातत्याने प्रबोधन करणे आवश्यक ठरले आहे. असे असतानाही याच बाबीला बगलफाटा मिळत आहे, असेच म्हणावे लागेल. छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापारी आणि नगरपंचायत प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. रात्री आठनंतर हॉटेल बंद ठेवण्याने व्यावसायिकांचे तर पूर्णत: कंबरडेच मोडले आहे. तालुक्यातील आरोग्य विभाग सतर्क राहून गेली वर्षभर कार्यरत आहे; मात्र इतर संस्था व बँका या संसर्गजन्य आजारांबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.
वडूजमध्ये गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असून, याला नागरिकांसह संबंधित बँक प्रशासनही जबाबदार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, महसूल आणि नगरपंचायत प्रशासनाने कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक ठरले आहे. नाही तर खटाव तालुक्यासह वडूज नगरीत कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यास वेळ लागणार नाही.
फोटो दि.०३वडूज कोरोना गर्दी...
फोटो ओळ : वडूज येथील बँका तसेच एटीएमजवळ सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडताना दिसून येत आहे. (छाया : शेखर जाधव )
--------------------------------------