कऱ्हाड : कोर्टाची पायरी शहाण्या माणसानं कधी चढू नये, असं सगळेच म्हणतात. कारण कोर्ट कचेरीमध्ये पैसा अन् वेळ वाया जातो. मात्र, शनिवारी शहाण्या माणसांना कोर्टाची पायरी चढावी लागली, ती म्हणजे केवळ आपल्या ग्रामपंचायतीच्या थकित रकमेसाठी. थकबाकीदारांना वर्षानुवर्षे थकित ठेवलेली रक्कम कोर्टाची पायरी चढताच एका दिवसात जमा करावी लागली.कऱ्हाड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या १९ हजार २६५ थकबाकीदारांना थकित रक्कम त्वरित भरण्यासाठी न्यायालयापुढे प्रत्यक्ष हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामध्ये तालुक्यातील १५८ ग्रामपंचायतींनी न्यायालयात १९ हजार २६५ थकबाकीदारांविरुद्ध दावे दाखल केले होते. यावेळी ५ हजार ९१७ थकबाकीदारांनी प्रत्यक्ष हजर राहून १ कोटी ४० लाख ८६ हजार १७ रुपये इतकी रक्कम जमा केली. थकित असणाऱ्या रकमेमुळे थकबाकीदारांविरोधात दावे दाखल करण्यात आल्याने त्याबाबत शनिवारी येथील दिवाणी व सत्र न्यायालय आवारात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, सहायक गटविकास अधिकारी धनंजय जगताप आदी उपस्थित होते. थकबाकीदारांनी प्रत्यक्ष हजर राहून थकित रक्कम भरली तर काहीनी कोर्टापुढे हजर राहून काही दिवसांची मुदत वाढवून मागितली. न्यायालय परिसरात लोकअदालतीसाठी जिल्हा परिषद व महसूल विभागामार्फत ग्रामपंचायत गटवार टेबल मांडले होते. ग्रामसेवकांमार्फत गावातील थकबाकीदारांकडून तडजोडीच्या माध्यमातून थकित रक्कम भरून घेतली गेली. (प्रतिनिधी)ऊस गेला नाय... पैसं कुठून भरू ?ग्रामीण भागातून एक वयोवृद्ध शेतकरी ग्रामपंचायतीची वर्षानुवर्षे थकित असलेली आपली थकित रक्कम भरण्यासाठी न्यायालयाच्या आवारात आले असता त्यांनी एका अधिकाऱ्याकडे बघत, ‘साहेब... आमच्या उसाला तोड अजून आली नसल्यानं आमचा ऊस अजून तुटून गेलेला नाय, त्यामुळं आमच्याकडं भरायला पैसं नायती, मगं आम्ही पैसं कुठूनं भरायचं,’ अशी कैफियत मांडली.शंभर रुपयांपासून वीस हजारांपर्यंत वसुलीशनिवारी न्यायालय परिसरात पार पडलेल्या लोकअदालतीवेळी थकित रक्कम असणाऱ्यांकडून शंभर रुपयांपासून वीस हजारांपर्यंत थकित कर रक्कम वसूल करण्यात आली. या लोकअदालतीमुळे तडजोडीतून मोठ्या प्रमाणात महसूल ग्रामपंचायत विभागाकडे जमा झाला.
न्यायालयात येताच थकबाकी जमा!
By admin | Updated: March 16, 2015 00:09 IST