यावेळी बळिराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, विश्वास जाधव, उत्तमराव खबाले, सागर कांबळे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पंजाबराव पाटील म्हणाले, राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका महावितरण कंपनीने सुरू केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी कोरोनाच्या काळात रात्रंदिवस शेतात राबून राज्यातल्या आणि देशातल्या जनतेला खायला अन्न धान्य पुरवले त्याला राज्य व केंद्र सरकारने मदत करायचे सोडून शेतकऱ्यांचे घरगुती व शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडून पिके वाळवत आहेत. केंद्र सरकारसुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करून शेती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम एका बाजूने करीत आहे, तर दुसऱ्या बाजूने राज्य सरकार अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडून कोंडी करीत आहे. ज्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केलेली असताना सरकारने त्यांच्यावर घोर अन्याय केलेला आहे. तरी सरकारने यात लक्ष घालून शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचे ताबडतोब थांबवावे व तोडलेली कनेक्शन पुन्हा जोडून देण्याचे आदेश द्यावेत. कर्नाटक राज्याप्रमाणे शेतीपंपासाठी दिवसा मोफत वीज देण्याचे जाहीर करावे. कोरोना काळातील घरगुती वीजबिल माफ करावे, अन्यथा बळिराजा शेतकरी संघटना राज्य सरकार व महावितरण कंपनीच्या विरोधात सोमवारी, दि. २२ रोजी कऱ्हाड तहसील कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेऊन महामोर्चाचे आयोजन करणार आहे.