म्हसवड : सध्या माण तालुक्यातील बळीराजा निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटात सापडला असून, अनियमित विजेची समस्या, खते मागणीच्या प्रमाणात उपलब्ध नाहीत तसेच अद्यापही पावसाने दमदार सुरुवात न केल्याने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. अशा तिहेरी संकटांचा सामना दुष्काळी माणचा बळीराजा करीत आहे.
वीजवितरण कंपनीच्या कार्यालयातील ढिसाळ कारभारामुळे कंपनी महासमस्यांची कंपनी बनली असून, वीज कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कामामुळे वारंवार वीज खंडित होत असल्याने पाणी असून दुष्काळी भागातील पिकांना पाणी न देता आल्याने उभी पिके पाण्यावाचून सुकू लागली आहेत. येथील वीज ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वारंवार विद्युतपुरवठा खंडित होणे, कर्मचारी वेळेवर काम करीत नाहीत, फिडरच्या इनकमिंग लाईन ब्रेकर होऊन वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. याकडे वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष होत आहे.
विजेचा लोड नसेल, तर एवढ्या वेळा ट्रिपिंग होऊन वीज खंडित का होते? शासनाने शहरातील विद्युतपुरवठा सुरळीत चालावा, वीज खंडित होऊ नये, यासाठी येथील सबस्टेशनला तीन-तीन वाहिन्या म्हसवड शहरासाठी वीज कायमस्वरूपी देण्यासाठी जोडल्या आहेत; पण प्रत्यक्षात दोनच सुरू असून, पिंपरी लोड शिल्लक नाही, तर शेनवडी वाहिनी अद्याप कार्यान्वित झाली नाही. फक्त मायणी वाहिनीवरूनच पुरवठा सुरू असून, या वाहिनीवर अनेकवेळा दोष निर्माण होतात व जादा दाबामुळे अनेकवेळा वीज खंडित होते; तर पावसाळ्यात पावसाचे थेंब पडायला लागले की वीज गायब होते; शेतकऱ्यांची पिके वाळून जातात, पीक हातचे जाते. याला जबाबदार कोण? शेती वाहिनी कामासाठी बंद केली, तर त्याची वेळ वाढवून दिली जात नाही. शहरातही वीज बारा-बारा तास पावसाळ्यात गायब होते. तिन्ही वाहिन्या असून, या कामांच्या ढिसाळपणा व दुर्लक्षामुळे शहरातील व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागते.
(चौकट)
याला जबाबदार कोण?
तत्कालीन राज्याचे ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून २००९-१० मध्ये ३३ कोटी खर्चाचे म्हसवड येथे विद्युत उपकेंद्र मंजूर केले. यासाठी जमीन अधिग्रहण केली गेली. पण येथे उपकेंद्राची गरज नसल्याचे नंतर आलेल्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिशाभूल करीत त्यावेळेस म्हसवड भागात मागणी कमी आहे, असे दाखवून त्या ठिकाणी सोलर सौरऊर्जा प्रकल्प माथी मारत कार्यान्वित केला गेल्याने आजपर्यंत दहा वर्षें उलटूनही गरज असतानाही विद्युत उपकेंद्र होऊ शकले नाही. ते झाले तर वारंवार वीज खंडित होणे ,कमी दाबाने वीज मिळण्याच्या समस्येतून वीज ग्राहकांची सुटका झाली असती.
(कोट..)
शेजारील सोलापूर, सांगली जिल्ह्यातून खते आणावी लागत आहेत. तिथे तत्काळ उपलब्ध होत आहेत. आपल्या इथे का मिळत नाहीत, तसेच औषधे, बी-बियाणे चढ्या भावात विक्री केली जात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तालुक्यातील संबंधित कृषी खात्याच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली.
- प्रकाश पवार, तालुका कृषी अधिकारी
कोट...
युरिया मागणीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना ५० टक्केच पुरवठा होत असल्याची परिस्थिती आहे. पण सबडिस्ट्रिब्युटरने युरियाची मागणी केल्याप्रमाणातच युरियाचा पुरवठा होत आहे. पण दुकानदारांची मागणी कमी असल्याने पुरवठा कमी होत आहे.
- बाळासाहेब माने, शेतकरी