सातारा/कऱ्हाड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब पाटील आणि बँकेचे माजी संचालक लालासाहेब शिंदे यांनी राष्ट्रवादी विरोधातील बंड अखेर मागे घेतले. या दोघांनी निर्णय घेण्यास उशीर लावला असला तरी बाळासाहेबांच्या हाती ‘नारळ’ अन् लालासाहेब शिंदे यांचा ‘टीव्ही’ सुरू होण्याआधी बंद पडल्याची खुमासदार चर्चा कऱ्हाड व कोरेगाव तालुक्यात सुरू आहे. मंगळवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत प्रक्रिया मतदार संघातून कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाच्या उमेदवार निवडीच्या चुकीच्या पद्धतीवर त्यांनी ‘नारळ’रूपी खापर फोडले. त्यामुळे आता आरपारची लढाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कुठले काय राष्ट्रवादीनेच त्यांच्या हाती ‘नारळ’ सोपविल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे बाळासाहेबांची ही सपशेल माघार पराभवाच्या भीतीने की दादा, नेत्यांच्या धास्तीने याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, करंजखोप येथील बँकेचे माजी संचालक लालासाहेब शिंदे यांचा पाठिंबा मिळविण्यातही राष्ट्रवादीला यश आले असून, शिंदे यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील माने यांना पाठिंबा जाहीर केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत बंडखोरांना थोपविण्याचे सत्र राष्ट्रवादीने सुरूच ठेवले आहे. कोरेगाव सोसायटी मतदारसंघात लालासाहेब शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे यांनी बंड केले. कोरेगावमध्ये शिंदे यांचा गट मजबूत असून, बहुतांश सोसायट्यांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासमोर अडचण निर्माण झाली होती. या अडचणींना दूर करण्यात राष्ट्रवादीची फौज कामाला लागली होती. दरम्यान, १ मे रोजी राष्ट्रवादीने कोरेगावात सुनील माने यांच्या प्रचारासाठी मेळावाही आयोजित केला होता. या मेळाव्यातच बहुतांश विरोध मावळला होता. लालासाहेब शिंदे यांची मनधरणी करण्यात यश आले. शनिवारी लालासाहेब शिंदे यांनी रामराजेंकडे पाठिंब्याचे पत्र दिले. (प्रतिनिधी) बाळासाहेबांचा पराभव ठरला असता नामुष्की! आमदार बाळासाहेब पाटील हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. बंडखोरी करून बाळासाहेबांना पराभवाला सामोरे जावे लागले, तर अजित पवारांचे निकटवर्तीय पराभूत झाले, असा संदेश जाऊ शकतो, असा तर्क लढवित दिग्गजांनी ही बाब अजित पवारांच्या कानावर घातली. शेवटी बाळासाहेबांना त्यांनी निरोप धाडला आणि बाळासाहेबांनी शनिवारी खर्डेकरांना पाठिंबा जाहीर केला.
बाळासाहेबांच्या हाती ‘नारळ’ अन् लालासाहेबांचा टीव्ही बंद !
By admin | Updated: May 3, 2015 00:53 IST