सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरात श्री अयप्पा सेवा मंडळाच्या वतीने रविवारी अयप्पा स्वामींची २५ वी रौप्यमहोत्सवी वार्षिक महापडीपूजा मोठ्या उत्साहात झाली. श्री अयप्पा देवाची प्रतिमा भव्य अशा फुलांच्या २५ फूट मेघडंबरीवर तीन मंदिरांतून साकारण्यात आली होती.हा नयनरम्य देखावा अतिशय सुरेख बनविण्यात आला होता. नयनमनोहर रंगीत आकर्षक रांगोळ्या, कलाकारांनी शेवंती, आॅस्टर, झेंडू, जरबेरा, कार्नेशन, मनिप्लांट आर्किड, गुलाब, मोगरा या प्रकारची फुले वापरून केलेली आरास अतिशय आकर्षक झाली होती. तसेच द्राक्षे, लिंबू, नारळ आदी फळांच्या विविध देवतांना घातलेल्या माळा आकर्षण ठरत होत्या. या सोहळ्याची सुरुवात शनिवारी अक्षय ब्लड बँकेच्या मदतीने घेतलेल्या रक्तदान शिबिराने झाली. सायंकाळी प्रवीण महाराज शेलार यांच्या श्री विठ्ठल गुरुकुल वारकरी शिक्षण मंडळाच्या बाल वारकऱ्यांच्या हरिपाठ व नामघोष झाला. रविवारी श्री अयप्पा स्वामींच्या मूर्तीस महाभिषेक, पूजा, आरती झाल्यावर रथोत्सवास सुरुवात झाली. रथ सोळशीचे नंदगिरी महाराज व मान्यवरांच्या हस्ते पूजन केल्यावर मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला. त्यावेळी स्वामी शरणम् अयप्पा.. अयप्पा स्वामींचा जय असो.., असा जयघोष करण्यात आला. (प्रतिनिधी) महाआरती प्रज्वलितदुपारी एक वाजता सातारा येथील प्रभाकर गुरू स्वामी, नंदगिरी महाराज व जरंडेश्वर देवस्थानचे धनंजयगिरी महाराज व आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते अयप्पा स्वामींची महाआरती प्रज्वलित करण्यात आली. यावेळी श्री भगवान अयप्पांचे चरित्र बाळासाहेब भाटे यांनी सांगितले.
अयप्पा स्वामींची महापडीपूजा उत्साहात
By admin | Updated: December 29, 2014 00:05 IST