रामापूर : पाटण येथील तहसील कार्यालयात दुचाकीची पार्किंग व्यवस्था कोलमडली आहे. तहसील कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या दुचाकी अस्ताव्यस्त लावल्या जातात. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयातील पार्किंगबाबत कोणीही उपाययोजना करीत नाही. प्रत्येकाची याठिकाणी मनमानी सुरू आहे. त्यामुळे कुणीही या आणि कुठेही वाहने पार्क करा, अशी परिस्थिती दिसून येत आहे. याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांनी लक्ष घालून पार्किंगची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
कऱ्हाड ते ढेबेवाडीपर्यंत दुभाजकात वाढले गवत
मलकापूर : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम झाले. त्यावेळी अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दुभाजकाची निर्मिती करण्यात आली. या रस्त्याचे काम केलेल्या कंत्राटदाराने देखभाल दुरुस्ती करण्याची मुदत काही दिवस होती. ती मुदत संपल्यानंतर रस्त्याच्या देखाभालीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. हळूहळू दुभाजकातील झाडे वाळत गेली. तर पावसामुळे गवत वाढत गेले. महिला उद्योग ते चचेगाव परिसरात गवत वाढल्याने व रिफ्लेक्टरची मोडतोड झाल्यामुळे दुभाजकाची दुरवस्था झाली आहे.
पाटण ते चोपडीपर्यंतच्या रस्त्याची स्थिती दयनीय
रामापूर : पाटण, त्रिपुडी ते चोपडी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाटण त्रिपुडी ते चोपडी मार्गावर मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात झाले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस दयनीय बनत असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी तसेच ग्रामस्थांमधून केली जात आहे.
कोपर्डे हवेली येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात
कोपर्डे हवेली : येथील विविध संस्था, शाळा यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण मुख्याध्यापिका कल्पना साळुंखे यांच्या हस्ते, जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण उपशिक्षिका नलिनी जगताप यांच्या हस्ते, सिद्धेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यू. ए. बनसोडे यांच्या हस्ते, हनुमान दूध संस्थेचे डॉ. आय. एम. मुल्ला यांच्या हस्ते, कोपर्डे हवेली दूध डेअरीचे फौजी सागर करांडे यांच्या हस्ते तर सिद्धेश्वर विकास सेवा सोसायटीचे ध्वजारोहण नाना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
जागृती विद्यामंदिर येथे ध्वजारोहण उत्साहात
कोपर्डे हवेली : बनवडी, ता. कऱ्हाड येथील जागृती विद्यामंदिरमध्ये ध्वजारोहण उपशिक्षिका जयश्री जयकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शंकरराव खापे, सचिव विनायक माळी, खजिनदार कांतीलाल पाटील, मुख्याध्यापक सुधाकर चव्हाण, संचालक शिवाजी करांडे, किशोर पाटील, सयाजी करांडे, भाऊ घाडगे, प्रभावती माळी, फरिदा मुल्ला, आनंदा वाकुर्डे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, शिक्षेकतर कर्मचारी उपस्थित होते. विनायक जाधव यांनी आभार मानले.
पोलीस उपअधीक्षकांना मनसेकडून निवेदन
कऱ्हाड : ऊर्जामंत्र्यांसह वीज कंपनीच्या संचालकांवर फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी मनसेच्यावतीने पोलीस उपअधीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, वाहतूक सेनेचे सतीश यादव, झुंजार यादव, नितीन महाडिक, महिला मनसेच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षी पोळ, चंद्रकांत गायकवाड, राजेंद्र कांबळे, रोहित मोरे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष विनायक भोसले, अमोल हरिदास, आबा गडाळे, स्वप्नील गायकवाड, संदीप लोंढे, संभाजी सकट, प्रवीण गायकवाड उपस्थित होते.