यश ऊर्फ निखिल गणेश कारंडे (वय १८, रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तर याप्रकरणी तडीपार असलेल्या रोहित रमेश कारंडे (वय २४, रा. चांभार गल्ली, कऱ्हाड) याच्यासह त्याचा साथीदार असलेल्या अतीष लादे (रा. लादे गल्ली, बुधवार पेठ, कऱ्हाड) अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गुरुवार पेठेत बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास यश कारंडे आणि सोमनाथ कारंडे हे उभे असताना रोहित कारंडे व अतीष लादे त्याठिकाणी आले. त्यांनी यशला मारहाण करण्यास सुरुवात केली. सोमनाथ भांडणे सोडवायला आला. मात्र अतीष याने त्याला मारहाण केली. रोहितने यशला मारहाण करत तुला जिवंत ठेवणार नाही. मी तडीपार असल्याची पोलिसांना माहिती देतोस काय, असे म्हणत चाकूने भोसकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रोहित कारंडे याला ताब्यात घेतले असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.