कोरेगाव : ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता अहोरात्र
कोरोनाबाधित मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरेगाव
नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सामाजिक भावनेतून सोमवारी आर्थिक मदतीचा
हात देऊ करण्यात आला. यासाठी तलाठी प्रशांत पवार व डॉ. गणेश होळ यांनी यासाठी
पुढाकार घेतला आहे.
कोरोनाबाधित मृत रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे उकळले जात असल्याचे
वृत्त आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. गेली वर्षभर कोणतेही विमा
संरक्षण नसताना, वेळेत पगार होत नसतानादेखील आपले कर्तव्य म्हणून
नगरपंचायतीचे सहा कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन अंत्यसंस्काराचे काम पार पाडत होते. त्यांच्या कार्यपद्धतीवर संशय घेऊन आरोप झाला होता.
शहरातील सोनेरी ग्रुप या सेवाभावी संस्थेने या विषयाच्या खोलात जाऊन
माहिती घेतली. त्यांच्या उपजीविकेचा विषय समोर आल्यानंतर अनेकांचे डोळे
पाणावले. त्यांच्या व्यथा समाजमाध्यमातून लोकांसमोर आणल्या आणि
प्रशासनाला त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यास सांगितली. सोमवारी पंचायत
समितीच्या सभागृहात झालेल्या कोरोनाविषयक आढावा बैठकीत या विषयावर चर्चा
घडवून आणल्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांनी मुख्याधिकारी विजया घाडगे यांना
सहा कर्मचाऱ्यांना तत्काळ पगार व आर्थिक मोबदला देण्याविषयी सूचना
केली.
कोरेगाव तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्यासह जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. गणेश होळ यांनी या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देऊ केला. १४ हजार रुपये रोख स्वरुपात या कर्मचाऱ्यांना नगरपंचायतीच्या सभागृहात प्रदान करण्यात आले. यावेळी किशोर बर्गे, संतोष नलावडे, अजित बर्गे, पृथ्वीराज बर्गे, आनंद गोरे, किरण देशमुख, निवास मेरुकर, अजित बर्गे यांच्यासह कर्मचारी उपस्थित
होते.
फोटो नेम : १९ कोरेगाव
कोरेगाव नगरपंचायत कर्मचारी महिपाल येवले यांना रोख स्वरुपात मदत करण्यात आली. यावेळी प्रशांत पवार, आनंद गोरे, डॉ. गणेश होळ, किशोर बर्गे, विजया घाडगे आदी उपस्थित होते. (छाया : साहिल शहा)