सातारा : पाऊस पडावा यासाठी माणसं नानाविध उपाय योजतायत. कुठं महादेवाला कोंडून ठेवताय तर कुठं शिवलिंग डोक्यावर घेऊन गावभर आरोळ्या देत वरुणराजाची आळवणी करतायत. कुणी देवही पाण्यात ठेवतंय... पण एवढे सगळे यत्न करूनही मेघराजाला काही केल्या पाझर फुटेना. असं म्हटलं जातं की सगळं उपाय करून थकल्यावर माणसाला गाढवाचेही पाय धरावे लागतात. अगदी तस्संच काहीसंं साताऱ्यात घडलं. निसर्गापुढं हात टेकलेल्या माणसानं चक्क गाढवाचे पाय थरले अन् बोहल्यावरउभं करून दोन गाढवांचं लग्न लावून चांगल्या पावसाची प्रार्थना केली.स्थळ जुनी भाजीमंडई, रविवार पेठ, सातारा. वेळ अकरा वाजून पाच मिनिटांची. एरव्ही बाजारासाठी येणाऱ्या ग्राहक-विक्रेत्यांनी गर्दीनं बहरलेला हा परिसर बुधवारी मात्र एका वेगळ्याच कारणानं गजबजून गेला होता. लोकांची लगबग सुरू होती... पण बाजारासाठी नव्हे तर एका आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्यासाठी. पावसानं पाठ फिरविल्यामुळं वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी येथील रहिवाशांनी चक्क गाढवाचा विवाहसोहळा आयोजित केलेला. तहसील कार्यालयासमोर गाढवाच्या लग्नाची सगळी तयारी झाली होती. दोन्ही बाजूकडील वऱ्हाडी मंडळीही उपस्थित होती. अशातच साजशृंगार केलेली लाजरी नववधू आणि डोक्यावर टोपी, मुंडावळ्या बांधलेला रुबाबदार वर यांना वाजतगाजत विवाहस्थळी आणण्यात आले. भरजरी लाल रंगाच्या चुनरीत चेहरा लपवून वधू गाढव आपल्या भावी सोबत्याबरोबर लाजत-मुरडत चाललेली पाहून रस्त्यावरील वाहनेही थबकली. सर्व तयारी झाल्यानंतर अकरा वाजून पाच मिनिट या शुभमुहूर्तावर लग्नाला प्रारंभ झाला. अशा या अनोख्या लग्नाची ही तिसरी गोष्ट. तिसरी यासाठी की यापूर्वी दोन वर्षे अशाच प्रकारे रविवार पेठेतील जुन्या भाजीमंडईतील ग्रामस्थांनी गाढवाचं लग्न लावल्यामुळं चक्क पाऊस पडल्याचा दावा केला आहे. यंदा या लग्न समारंभासाठी लोकवर्गणी काढण्यात आली. प्रत्येकाने दहा-वीस रुपये दिले.लग्नसमारंभास संजय कांबळे, राजू कांबळे, तानाजी बडेकर, मुन्ना फरास, अजय घाडगे, मनोज घाडगे, रवी सोलंकी, जया शिवघण, शोभा रणपिसे, मालन रणपिसे, मीना पिसे व पेठेतील सुमारे साठ ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)ढोलीबाजा अन् आंतरपाटया लग्नासाठी साडेचार हजार रुपये खर्च आला. दीड हजार रुपये भाडे देऊन गाढवं आणली होती. याशिवाय गाढवांना सांभाळणारे, ढोलीबाजा, हारतुरे, चुनरी, टोपी, आंतरपाट व इतर असा एकूण साडेचार हजार रुपयांचा खर्च या लग्नासाठी करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दोन्ही गाढवांमध्ये आंतरपाट धरून मंगलाष्टक म्हणण्यात आल्या. वधू गाढवाच्या मागे मुलीचा मामा म्हणून एकजण हातात लिंबू खोवलेला सुरा धरून उभा होता. नवदाम्पत्यावर अक्षतांचा वर्षाव केला अन् वाजंत्रींनी वाद्यांचा गजर केला. लग्नाची अशीही दंतकथा...मेघ हा पृथ्वीचा पती असल्याची दंतकथा सांगितली जाते. म्हणूनच पाऊस आला की, ‘धरणी माय.. तुझा पती आला गं बाय’ असे म्हटले जाते. मेघ बरसत नाही म्हणून त्याची भार्या पृथ्वी हिचं लग्न गाढवाशी लावून खिजवलं जातं. जेणेकरून आपल्या पत्नीच्या रक्षणासाठी मेघराजा धावून येईल, असा एक समज आहे.
गाढवांची लगीनघाई..!
By admin | Updated: August 26, 2015 21:38 IST