वाई : वाई नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सिद्धनाथवाडीतील अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीची व डांबरीकरणाची कामे कोरोनाच्या संसर्गामुळे गेले सात ते आठ महिने रखडली होती. प्रचंड रहदारी असणाऱ्या व वाई शहराला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामांचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी नगरसेविका रेश्मा जायगुडे, माजी नगरसेवक प्रदीप जायगुडे, हणमंतराव दुधाणे, संजय चव्हाण, शंकरराव वाघ, बापुराव खरात, युगल घाडगे, राहुल जायगुडे, किरण दुधाणे, नितीन चौधरी यांची उपस्थिती होती.
रेश्मा जायगुडे म्हणाल्या, ‘आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून वाई नगरपालिकेच्या माध्यमातून सिद्धनाथवाडीतील अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीसाठी लाखोंचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु, कोरोनाच्या महामारीमुळे गेले काही महिने विकास ठप्प झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. त्यामुळे वाई शहरातील अंतर्गत कामे रखडली होती. याचा पाठपुरावा केल्याने गेले काही महिने रखडलेले डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात यश आले.’
रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी होती; परंतु नगरपालिकेला कोरोनामुळे डांबरीकरणाला मुहूर्त मिळत नव्हता. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना व ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकहिताचा विचार करून त्वरित या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करावे व वाहनचालकांना होणारा त्रास कमी करावा व रहदारीसाठी नेहमीच वर्दळ असणारा रस्ता वाहतुकीलायक व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत.