कऱ्हाड : करमाळा तालुक्यातील रावसाहेब जाधव या संशयित सराफाचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रविवारी सकाळी शेकडोंचा जमाव कऱ्हाडला दाखल झाला. दोषी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी, अशी मागणी या जमावाने केली. कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची आक्रमक भूमिका जमावाने घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले हाते. रात्री उशिरापर्यंत हा जमाव पोलिस ठाण्यातच थांबून होता. (प्रतिनिधी) गुन्हे शाखेची खोली कुलपात! कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेची खोली वाहतूक शाखेनजीकच आहे. दररोज या कक्षात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्दळ असते; मात्र रविवारी सकाळीच ही खोली बंद करून कुलूप घालण्यात आले होते. दुपारी गुप्तचर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही खोली उघडून तपास केला. त्यानंतर ती पुन्हा कुलूपबंद करण्यात आली. ...तर मारहाणीचा गुन्हा दाखल करा! रावसाहेब जाधव यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करता येत नसेल तर त्यांच्यासह अनिल डिकोळे या युवकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरली. अनिल डिकोळे या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी असून, त्याची फिर्याद घ्यावी, असे जमावाचे म्हणणे होते. ‘सीआयडी’ पथक कऱ्हाडात पोलिसांच्या ताब्यातील संशयित रावसाहेब जाधव याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच गुप्तचर विभागाचे उपअधीक्षक एस. एन. जगताप, निरीक्षक दीपा यादव यांच्यासह एक पथक शनिवारी रात्रीच कऱ्हाडात दाखल झाले. या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. रविवारी दिवसभर हे पथक कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. गुन्हे शाखेतील कागदपत्रे ताब्यात रावसाहेब जाधव याच्या मृत्यूप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे गुप्तचर विभागाने रविवारी ताब्यात घेतली. तसेच गुन्हे शाखेतूनही काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. कार्वेनाका येथील पोलिस चौकीचीही या पथकाने तपासणी केली असूनही तेथूनही काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. आज मोर्चाचे आयोजन शहर पोलिस ठाण्यात रात्री दहाच्या सुमारास जमाव जमला होता. यावेळी दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सोमवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मिरजेत इन कॅमेरा शवविच्छेदन रावसाहेब जाधवचा मृतदेह रविवारी सकाळी शवविच्छेदनासाठी मिरजला पाठवून देण्यात आला. मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल वालनेसवाडी येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पॅनलमार्फत न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. यावेळीही रुग्णालय परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मारहाण केल्याची दुसऱ्या संशयिताची माहिती रावसाहेब जाधव याच्यासह पोलिसांनी अनिल डिकोळे (रा. घोटी, ता. करमाळा) या संशयिताला ताब्यात घेतले होते. रविवारी अनिल डिकोळे याला पोलिसांनी सोडून दिले. त्यावेळी पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची माहिती डिकोळेने प्रसिद्धी माध्यमांसह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच त्याने मारहाण करणाऱ्या अधिकारी व काही कर्मचाऱ्यांची नावेही सांगितली. ‘शनिवारी दुपारी मला जीपमधून विनाकारण कऱ्हाड शहर परिसरात फिरवले जात होते,’ असेही त्याने सांगितले. त्यांच्या अंगावरील मारहाणीच्या खुणाही त्याने उपस्थितांना दाखविल्या. दोन्ही संशयितांच्या अंगावर व्रण! रावसाहेब जाधव व अनिल डिकोळे या दोघांच्याही अंगावर व्रण असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी सांगितले. पोलिस पथक या दोघांना पकडण्यासाठी गेले असताना दोघेही पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी ते पडलेही होते. त्यामुळे पडून दुखापत झाल्याच्या खुणाही त्यांच्या अंगावर असल्याचे अप्पर अधीक्षक पवार यांनी पत्रकारांना सांगितले. शवविच्छेदन अहवालानंतरच होणार निर्णय पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जमाव आक्रमक झाल्यानंतर गुप्तचर विभागाचे उपअधीक्षक एस. एन. जगताप जमावाला सामोरे गेले. त्यांनी कार्यवाहीची प्रक्रिया समजावून सांगितली. जोपर्यंत शवविच्छेदन अहवाल मिळत नाही किंवा आम्ही कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचत नाही, तोपर्यंत गुन्हा दाखल करता येत नसल्याचे त्यांनी जमावाला सांगितले. मात्र, त्यानंतरही जमाव आपल्या भूमिकेवर ठाम राहिला.
पोलिसांना अटक करा; मगच मृतदेह ताब्यात घेतो!
By admin | Updated: June 20, 2016 00:40 IST