सातारा : सैदापूर (ता. सातारा) येथील मुकेश विजय गोसावी (वय २४) या युवकाला दुचाकीवरून नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये मुकेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुमारे सहाजणांवर संशय असून, आज, सोमवारी सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा पोलिसांकडे नोंद झालेला नव्हता. याबाबत जिल्हा रुग्णालयात आलेले नातेवाईक व मित्रांकडून समजलेली माहिती अशी की, मुकेश गोसावी हा सातारा शहराजवळील यशवंतनगर (सैदापूर) येथे राहतो. काल सायंकाळी जुन्या भांडणाच्या कारणावरून प्रथम दोघांनी मुकेशला मारहाण केली. त्यानंतर दुचाकीवरून नेऊन त्याच्यावर चॉपरने वार करुन दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार घडल्यानंतर मुकेशला सोडून सर्वजण निघून गेले. पहाटेच्या सुमारास मुकेश घरी आल्यावर मारहाणीचा हा प्रकार समोर आला. त्यानंतर मुकेशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. त्याला सुमारे सहाजणांनी मारहाण केल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस जखमी मुकेश याचा जबाब घेत होते. रात्रीपर्यंत सातारा तालुका पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद झालेला नव्हता. (प्रतिनिधी)
सैदापुरात युवकावर सशस्त्र हल्ला
By admin | Updated: December 29, 2014 23:50 IST