सातारा : पिंपरद (ता. फलटण) येथील अनिकेत राजेंद्र शिंदे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण सेवेत लेफ्टनंटपदी (वर्ग १) निवड झाली असून, देशातील निवड झालेल्या ५० जणांत अनिकेत शिंदे यांनी नववा क्रमांक मिळविला आहे.
अनिकेत शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण पिंपरद येथे, तर माध्यमिक शिक्षण सातारा येथील नवोदय विद्यालयात विशेष प्रावीण्यासह गुणवत्ता यादीत झाले असून, पुण्याच्या उद्यानविद्या महाविद्यालयात त्यांनी पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. यानंतर त्यांची इंडियन मिल्ट्री अकॅडमी डेहराडून येथे राष्ट्रीय संरक्षण सेवेत लेफ्टनंटपदी निवड करण्यात आली.
प्रथमपासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या अनिकेत यांचे आई-वडील सर्वसामान्य शेतकरी असूनही शिंदे कुटुंबातील प्रशासकीय सेवेत उत्तुंग यश संपादन करण्याचा वारसा कायम ठेवण्यात आला असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांचे चुलते जिल्हा कोषागार अधिकारी धनाजीराव शिंदे यांनी प्रतिपादन केले असून, अनिकेतच्या यशाबद्दल शिस्त, जिद्द व ध्येयपूर्तीसाठी मेहनत व राष्ट्रप्रेम, आदी गुण संरक्षण सेवेत उच्च पदस्थ अधिकारी होण्यात महत्त्वाचे ठरले आहेत.
अनिकेत याने लेफ्टनंटपदी मजल मारून ग्रामीण भागातील तरुण पिढीपुढे आदर्श ठेवल्याचे गौरवोद्गार विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी कौतुक केले. त्याच्या यशाबद्दल आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.
आयकार्ड फोटो आहे.