लोकमत न्यूज नेटवर्क
कोळकी : वनदेवशेरी, कोळकी (ता. फलटण) येथील अंगणवाडीने राबविलेला परसबाग व वृक्षारोपणाचा उपक्रम स्तुत्य असून, या उपक्रमास येथील महिला व ग्रामस्थ यांनी केलेले सहकार्य प्रशंसनीय आहे. वनदेवशेरी अंगणवाडीने राबविलेला हा उपक्रम अन्य अंगणवाड्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
कोळकी (ता. फलटण) येथील वनदेवशेरी अंगणवाडी क्र. १ यांच्यावतीने परसबाग व वृक्षारोपण उपक्रमाचा प्रारंभ संजीवराजे यांच्याहस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय शिंदे, सरपंच विजया नाळे, उपसरपंच संजय कामठे, ग्रामपंचायत सदस्य विकास नाळे, डॉ. अशोक नाळे, रमेश नाळे, शिवाजी भुजबळ, गणेश शिंदे, अक्षय गायकवाड, सौ. रेश्मा देशमुख, स्वप्ना कोरडे, निर्मला जाधव, वैभव नाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी परसबागेची पाहणी करत संजीवराजे यांनी परसबागेत लावलेल्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये व वेली याबाबतची माहिती घेत त्याचा वापर कशा पध्दतीने केला जाणार, याची माहिती अंगणवाडी सेविका उमा लिपारे यांच्याकडून घेतली.
यावेळी संजीवराजे व अन्य मान्यवरांच्या हस्ते आंबा, पेरू, फणस, रामफळ, सीताफळ, चिक्कू आदी झाडांचे वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांचे स्वागत विकास नाळे यांनी केले. आभार पर्यवेक्षिका विद्या कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमास सागर चव्हाण, सागर काकडे, विक्रम पखाले, विजय जठार, माउली शिंदे, संजय नाळे, विजय मोरे, विकास कुमठेकर, सौ. सोनम रिठे, शीतल घनवट, पुष्पा नाळे, मीना नाळे, प्रीती पिसाळ आदींसह वनदेवशेरी येथील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.