सातारा : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हिंदुकरण करण्याची कूटनीती देशात सुरू आहे. ती समजून घेऊन त्यापासून सावध राहावे,’ असे आवाहन दलित आदिवासी अधिकार आंदोलनाचे निमंत्रक अॅड. प्रियदर्शी तेलंग यांनी केले.येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद मैदानावर डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अॅड. तेलंग यांच्या हस्ते ‘कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता’ पुरस्कार विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक व संत रोहिदास सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश कारंडे यांना प्रदान करण्यात आला.यावेळी बोलताना अॅड. तेलंग म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्थिक, सामाजिक न्यायाची लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी संघर्ष केला. देशहिताच्या दृष्टीने त्यांनी आर्थिक प्रश्नांची मूलभूत मांडणी आणि विश्लेषण केले आहे. त्यांच्या आर्थिक विचारांची घोर उपेक्षा केली जात आहे. दलित आदिवासींच्या विकास योजनावरील अत्यल्प खर्च याचे निदर्शक आहे.’संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कोषाध्यक्ष केशवराज कदम, सहसचिव अनिल बनसोडे, विश्वस्त रमेश दुंजे, उत्तमराव पोळ, हौसेराव धुमाळ, प्रा. प्रशांत साळवे, सभागृह फाऊंडेशनचे सुशील कांबळे, दलित आदिवासी अधिकार आंदोलनाचे पुणे विद्यापीठातील समन्वयक अॅड. प्रभाकर सोनवणे, आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत आदी मान्यवरांसह विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा. प्रशांत साळवे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(प्रतिनिधी)सबका साथ, सबका विकास केवळ घोषणाचसबका साथ, सबका विकास केवळ घोषणाच असून, प्रत्यक्षात विनाशच दिसतो आहे. दलितांना उद्योगांसाठी भांडवल देणारी ‘स्टँड अप इंडिया’ योजनेचा टेंभा मिरविण्यात येत असला तरी त्याद्वारे जातीव्यवस्था हाणून पडेल, ही चुकीची कल्पना आहे. त्याद्वारे रोजगार निर्माण होण्याऐवजी दलितांना स्टँड अप नव्हे तर झोपविण्याचा उद्योग होईल, असे मत यावेळी अॅड. प्रियदर्शी तेलंग यांनी व्यक्त केले.