पाटण : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून ही निवडणूक बिनविरोध होणार, असे म्हणतानाच नेमके उलटे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. अर्ज छाननीनंतर आजी-माजी आमदारांमध्ये मोठे वाक्युद्ध सुरू झाले आहे. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. त्यामुळे २० मार्च या मतदान तारखेपर्यंत तालुक्यात देसाई-पाटणकर गटांकडून प्रचाराच्या तोफा धडाडणार, हे निश्चित झाले आहे. देसाई कारखान्याचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब देसाई, शिवाजीराव देसाई आणि आता आमदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सभासदांनी आत्तापर्यंत देसाई घराण्याच्या ताब्यात कारखान्याची सत्ता कायम ठेवली आहे. दुसरीकडे भागवतराव देसाई, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी सुद्धा कारखान्याच्या उभारणीत काही अंशी हातभार लावल्याचे म्हटले जाते. विक्रमसिंह पाटणकर हे काही काळ देसाई कारखान्याचे संचालक राहिले आहेत. त्यानंतर देसाई घराण्याच्या विरोधात पाटणकर घराण्यातील काही मंडळींनी नेतृत्व करून कारखान्याच्या निवडणुका लढविल्या; मात्र अपयश आले. कारण शेवटी सभासदांचा निर्णय अंतिम ठरतो. देसाई कारखाना निवडणुकीसाठी घडलेल्या ताज्या घटना व हालचालींवर नजर टाकता निवडणूक जाहीर होताच आमदार शंभूराज देसार्इंनी सभासदांचा मेळावा घेऊन कारखाना निवडणुकीत आपण गाफिल राहणार नाही, हे दाखवून दिले. तर दुसरीकडे विक्रमसिंह पाटणकर यांनी आपला गट निवडणूक लढविणार नाही; मात्र ज्या सभासदांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांना स्वातंत्र्य आहे, असा पर्याय राखून ठेवला होता. (प्रतिनिधी) पाटणमध्ये रणधुमाळीस सुरूवातउमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत आमदार देसार्इंनी ही विरोधी सेना पाटणकरांचीच असा दावा केला. तर विक्रमसिंह पाटणकरांनी म्हटले की, ‘आम्हाला काय दोष देता, हे तर तुमच्या कर्तृत्वाचे फळ आहे. तुमचा निषेध दाखविण्यासाठी सभासद निवडणुकीत उतरले आहेत. म्हणूनच आता देसाई कारखान्याच्या रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. १० मार्चनंतरच्या दहा दिवसांत देसाई कारखान्याच्या निवडणुकीस खरा रंग येणार आहे. पडद्याआड कोण? आणि समोरासमोर कोण? हे आता समजणार आहे. शेवटी मात्र आजी-माजी आमदारांमध्ये वणवा भडकणार आहे.
आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली!
By admin | Updated: March 3, 2016 00:02 IST