सातारा : येथील सत्यमनगर परिसरातील नेहा रेसिडेन्सी या इमारतीच्या पार्किंगमध्ये महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी चौघांवर प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशाने सातारा शहर पोलिसांनी जबरी चोरी, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
जालिंदर बाबूराव महानवर, छाया जालिंदर महानवर, शुभम रामचंद्र चव्हाण व अन्य एक महिला (सर्व रा. नेहा रेसिडेन्सी, सत्यमनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
संबंधित फिर्यादी व संशयित हे सर्व एकाच इमारतीत राहण्यास असून, १ जून २०२० रोजी यातील फिर्यादी या नेहा रेसिडेन्सी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असताना जालिंदर याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादीचे दुकान इमारतीच्या कॉलमवर आपटून त्यांना जखमी केले होते. तसेच ‘तुला पैशाची मस्ती आली आहे’, असे म्हणून त्यांच्या गळ्यातील सोन्याची दोन तोळे वजनाची चेन चोरून नेली होती. तसेच फिर्यादीला जवळ ओढून तिला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करून तिला जिवंत मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, हा प्रकार पाहून रोडवरून निघालेल्या दोन व्यक्तींनी हस्तक्षेप केल्यानंतर संशयित हे फिर्यादीची सोन्याची चेन व मंगळसूत्र घेऊन पळून गेले होते. त्यानंतर जखमी फिर्यादीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी फिर्यादीने प्रथवर्ग न्यायदंडाधिकारी, सातारा यांच्याकडे दाद मागितल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सातारा शहर पोलिसांना दिले. त्यावरून पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला.
सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे अधिक तपास करत आहेत.