मलकापूर : सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचा विचार न करता केलेले लॉकडाऊन पूर्णपणे रद्द करावे, अशी मागणी आगाशिवनगर व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे करण्यात आली. तसेच यापुढे कोणतेही लॉकडाऊन पाळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कृष्णा कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली. त्या वेळी हजारो लोक रस्त्यावर होते. त्या वेळी लॉकडाऊन का केला नाही. येथील लोकांची एवढीच काळजी होती तर निवडणुकांना परवानगी दिलीच कशी? निवडणुका घेतल्या त्या वेळी सभा व मेळावे यांना प्रतिबंध करायला हवा होता, तो केला नाही. त्या वेळी दुर्लक्ष केले, संचारबंदी असताना सभा झाल्या. त्या वेळी सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही. म्हणजे याचा अर्थ मंत्री, मान्यवर, सरकारी अधिकारी यांना लॉकडाऊन संचारबंदी लागू नाही. सामान्य जनतेची पिळवणूक करून एक प्रकारे लॉकडाऊन पद्धतीने क्रूर हत्या होतेय. निवडणुकीवेळी हजारो लोक रस्त्यावर आले त्या वेळी कोणतीही काळजी वाटली नाही. निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला लोकांची काळजी वाटायला लागली हे मोठे आश्चर्य आहे.
गोरगरीब, व्यापारी-दुकानदार, छोटे व्यावसायिक आणि सामान्य जनतेने जगायचे कसे, याचे उत्तर आम्हाला द्या. आम्ही आता कोणतेही नियम पाळणार नाही. आमच्यावर कारवाई केल्यास आम्हाला दुकानाचे भाडे, लाइट बिल, कामगारांचा पगार आम्हाला द्यावा. आम्ही दुकान बंद करून घरी बसतो. कोरोनाने नव्हे, उपासमारीने जनता तडफडून मारण्याचा डाव दिसत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, वाढते कर्ज, वाढते भाडे, वाढते शिक्षण शुल्क, पाणी व लाइट बिल, वाढते व्याज आणि रोजचा उदरनिर्वाह आळा कसा घालायचा? हे सर्व राजकारण जनतेच्या लक्षात आले आहे. आता शांत बसणार नाही. जितके पोलीस प्रशासन, पालिका कर्मचारी रस्त्यावर दिसत आहे त्याच्या दहापटीने जनता आक्रमक होऊन रस्त्यावर दिसेल. जनतेने पाऊल उचलण्याआधी राजकारण थांबवा आणि लॉकडाऊन संपवा अन्यथा आंदोलन तर होणारच, असा आक्रमक पवित्रा घेतला.
050721\img-20210705-wa0032.jpg
फोटो कॕप्शन
आगाशिवनगर व्यापारी संघटनेच्या वतीने लॉकडाऊन बंद करावे अशी मागणी येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आली. ( छाया- माणिक डोंगरे)