सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर ट्रक आडवा मारून एका टेम्पोचालकाला तीन हजार रुपयांना लुटणाऱ्या चौघांना सातारा शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटना घडल्यानंतर पोलिसांनी यापैकी दोघांना वाढे फाटा येथे तर एकाला खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथे अटक करण्यात आली.कुंडलिक दत्तू पाटील (रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), दत्तात्रय उर्फ संतोष विठ्ठल कोंडे (रा. भोर, जि. पुणे), नाना धुमाळ (रा. केळवली, ता. भोर, जि. पुणे), सुतार (पूर्ण नाव समजू शकले नाही) अशी अटक कलेल्यांची नावे आहेत. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, राजेसाहब गालीबसाहब नदाफ (वय ४४, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) हे टेम्पोचालक कासेगाव येथील एक विवाहसोहळा आटोपून पुण्याकडे निघाले होते. मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ते खिंडवाडी नजीक आले असतानाच पुण्याकडे निघालेल्या चौघांनी नदाफ यांना ट्रक आडवा मारला. अचानकपणे ट्रक आडवा मारल्यामुळे नदाफ यांनी त्याची विचारणा करताच कुंडलिक पाटील, दत्तात्रय उर्फ संतोष कोंडे, नाना धुमाळ आणि सुतार या चौघांनी ट्रक बाजूला थांबवला आणि खाली उतरत नदाफ यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. नदाफ यांच्याकडील तीन हजार रुपये आणि मोबाईल तसेच लायसन्स घेऊन त्यांनी पोबारा केला.यानंतर नदाफ यांनी याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यात देताच रात्र गस्तीच्या पथकाला त्याची कल्पना देण्यात आली. रात्रगस्तीवर असणारे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी हवालदार निलेश यादव, निलेश काटकर, संतोष महामुनी आणि चालक चव्हाण यांना बरोबर घेऊन चौघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यापैकी ट्रकचालकाला खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली तर उर्वरित तिघांना वाढेफाटा येथे ताब्यात घेतली आणि अटक केली. (प्रतिनिधी)चौघेही मित्र...टेम्पोचालकाला लुटणारे चौघेही एकमेकांचे मित्र असून काही दिवसांपूर्वी ते खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर काम करत असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
मध्यरात्री पाठलाग करून लुटारूंची टोळी पकडली
By admin | Updated: December 2, 2014 23:21 IST