सातारा : सातारा जिल्ह्यात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षीपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असल्याची गोड माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महाविद्यालयासाठी ४९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच तांत्रिक प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणून केंद्रीय समिती लवकरच या प्रकल्पाची पाहणी करणार आहे. पुढील वर्षात लवकरच मेडिकल कॉलेजची प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल अशी खात्रीशीर ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेत हे महाविद्यालय उभे राहणार असून त्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या इमारती हटवून योग्य निविदा प्रक्रियेनंतर काम झपाट्याने सुरू केले जाणार आहे.
दरम्यान, ‘जिल्हा रुग्णालयाचा स्टाफ मेडिकल कॉलेजसाठी औषधी व द्रव्य विभागाकडे हस्तांतरित झाला आहे. राज्य शासनाच्या कमिटीनंतर केंद्रीय आरोग्य समितीचे शिष्टमंडळ लवकरच या कामाची पाहणी करेल त्यानंतर पुढील ऑगस्ट २०२२ च्या नीट परीक्षेनंतर प्रत्यक्ष प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया राबविली जाण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र जो कर्मचारी वर्ग घेईल त्याचा अनुशेष राज्य शासनाने प्रस्तुत केलेल्या आरोग्य विभागाच्या भरतीत पूर्ण केला जाईल. एमडी, कार्डियोलॉजिस्ट व हाडरोग तज्ज्ञ व जनरल प्रॅक्टिशनर्स ही पदे लवकरच भरली जातील. प्रत्यक्ष कामाची कोणतीच अडचण होणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
सातारा कास रस्त्यावर अनधिकृत बांधकामांबाबत विचारलेल्या प्रश्नावर पालकमंत्री म्हणाले, अनधिकृत बांधकामांची तत्काळ चौकशी केली जाईल.’ मात्र, युनेस्कोने निर्धारित केलेल्या कास तलाव परिसराच्या संवेदनशील पट्ट्यात कोणतीही बांधकामे नसल्याचे शेखर सिंग यांनी स्पष्ट केले.
चौकट...
ग्रेड सेपरेटरमध्ये बसणार कॅमेरे
ग्रेड सेपरेटरमधील अंतर्गत तीन मार्गिकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून अंतर्गत बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी मोठा एलईडी स्क्रीन लावण्याची सूचना पालकमंत्र्यांनी सातारा नगरपालिकेला केली. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचे नाईट पेट्रोलिंग ग्रेड सेपरेटरमध्ये सुरू राहील, असे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सांगितले.