मलकापूर -
राष्ट्रीय मार्गावर गेल्या महिन्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. भरधाव वेगाने वाहने चालवून अनेक चालक स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. वेग मर्यादेचे उल्लंघन करतील अशा वाहनांवर कडक कारवाई करावी. या कारवाईच्या मोहिमेत सातत्य ठेवावे अशी मागणी मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे यांनी केली.
नगराध्यक्षा येडगे यांनी महामार्ग पोलीस केंद्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील व कराड शहर वाहतूक शाखेच्या सरोजनी पाटील यांची भेट घेतली. मलकापूर शहरातून राष्ट्रीय मार्ग जात असल्याने अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजनांबाबत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले. याप्रसंगी नगरसेविका आनंदी शिंदे, गीतांजली पाटील यांची उपस्थिती होती.
नगराध्यक्षा येडगे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,
कराड उपविभागात महामार्गावर डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ३१ जानेवारीला नारायणावाडीजवळ भीषण अपघातात तीन युवकांना जीव गमवावा लागला. तर ७ फेब्रुवारी रोजी रविवारी वहागांव येथे स्विफ्टच्या अपघातात चार जण ठार झाले. मलकापूर शहरातून हा मार्ग जातो. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी वेगाचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईची मोहीम सुरू करावी. कारवाईच्या मोहिमेत सातत्य ठेवल्यास नक्कीच अपघातांवर नियंत्रण येण्यास मदत होईल. आपण आपले कर्तव्य बजावत आहातच पण सुशिक्षित वाहन धारकांनीच नियम मोडल्याने अपघात होत आहेत. अशा वाहन धारकांवर कारवाई करून आपण वेग मर्यादेवर नियंत्रण आणावे. विशेषतः कोल्हापूर नाक्यावर कारवाईच्या मोहिमेत सातत्य ठेवावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.