महाबळेश्वर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने काही नियम जाहीर केले आहेत; परंतु काही नागरिक व दुकानदार हे या नियमांचे पालन करीत नाहीत, अशा दुकानदारांविरोधात प्रशासनाच्यावतीने दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शनिवारी एकाच दिवशी १२ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी दिली.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून शहरातही झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेक महिन्यांनंतर शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या शंभराच्या घरात पोहोचली आहे. अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्याचे कठीण आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी शासनाने नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच रेस्टाॅरंटमध्ये पन्नास टक्के ग्राहकांना प्रवेश देण्यात येणार आहे. बाजार पेठेतील दुकानात पाचपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने शहरात स्पिकरवरून वारंवार दिला होता. तरीही काही दुकानदार या नियमांकडे दुर्लक्ष करीत होते. शनिवारी पालिका, पोलीस व महसूल या विभागाचे कर्मचारी असलेले विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाच्यावतीने बाजारपेठेत कारवाई केली. तीन दुकानदारांवर प्रत्येकी तीन हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
कोट..
या पथकाने मास्क न घालता बाजारपेठेत फिरत असलेल्या सहा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल केला. अशा प्रकारे या विशेष पथकाने एकाच दिवसात कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी १२ हजारांचा दंड वसूल केला आहे.
-पल्लवी पाटील, मुख्याधिकारी