लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अन्न व औषध प्रशासनाने गेल्या दोन दिवसात गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम राबवली. यामध्ये गुटख्याचा साठा व गुन्ह्यात वापरलेली वाहने असा मिळून तीन लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासन सातारा कार्यालयाने ३ ते ५ या कालावधीत प्रतिबंधित अन्नपदार्थांची अवैध विक्री रोखण्याची मोहीम राबविली. यामध्ये अंतर्गत सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून गुटखा, पानमसाला, सुगंधित, स्वादिष्ट तंबाखू तसेच सुगंधित स्वादिष्ट सुपारीचा साठा व प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन असा एकूण तीन लाख ४१ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.
महेश हणमंत यादव (रा. कुमठे, ता. कोरेगाव) हा वाहनामधून (एमएच ११ बीएल ४६४३ (ॲपेरिक्षा) सिव्हिल परिसरात अवैधरीत्या प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री करत असताना आढळून आला. त्याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थाचा २५ हजार ६२८ रुपये व वाहन किंमत अंदाजे एक लाख ७० हजार असा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात अन्नसुरक्षा व मानदे कायद्यांच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सुभाष सदाशिव कोकरे, वाहनचालक व जितेंद्र गोविद चिंचकर, वाहनमालक (दोघे रा.वसंतगड, ता. कऱ्हाड) यांच्या वाहनामधून (एमएच ११ वाय ४०८९) अवैधरीत्या प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्रीकरिता वाहतूक करत असताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थाचा एकूण किंमत ८७ हजार ४९८ तसेच त्यांचे वाहन किंमत अंदाजे ८० हजार असा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वाहनचालकाचा परवाना व वाहनाची नोंदणी रद्द करण्यासाठी संबंधित मोटर परिवहन अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासच्या वतीने देण्यात आली.