पुसेगाव: पश्चिम महाराष्ट्रातील खेड-मंचरनंतर बटाटा बियाणे खरेदी व विक्रीसाठी पुुसेगाव बाजारपेठेचे नाव राज्यात प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांनी बियाण्याबाबत हेतुपुरस्सर केलेल्या आरोपांमुळे बाजारपेठेचे नाव बदनाम होणार असल्याने व्यापारी संघटनेच्या झेंड्याखाली गावातील व्यापारी एकवटले आहेत.पुसेगावच्या बाजारपेठेत सांगली, खानापूर विटा, तासगाव, आटपाडे, सांगोला, अकलूज, फलटण तसेच सातारा व कोरेगाव भागातील शेतकरी विश्वासाने बटाटा बियाणे खरेदी करण्यासाठी येतात. परंतु दरम्यान, ‘मी स्वत: शेतकरी कुटुंबातील आहे. मला शेतकऱ्यांविषयी कळवळा व सहानुभूती असून, माझ्याकडे शेतीमाल खरेदी-विक्रीचा परवानाही नाही. पुसेगावसारख्या नावाजलेल्या बाजारपेठेत मी कुणालाही बटाट्याचे बोगस बियाणे विकलेले नाही. केवळ पूर्वग्रहदूषित वृत्तीने मला व बाजारपेठेला बदनाम करण्याचा हा कुटील डाव काही शेतकऱ्यांनी रचला आहे,’ असे जाधव ट्रेडिंग कंपनीचे मालक वैभव जाधव यांनी म्हटले आहे. ‘संबंधित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार माझ्याकडून बटाटा बियाणे खरेदी केले असल्यास ते त्यांनी सिद्ध करून दाखवावे; अन्यथा मला व पुसेगाव बाजारपेठेला बदनाम करणाऱ्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.पुसेगाव, ता. खटाव येथील बटाटा बाजारपेठेतून खरीप हंगामात बटाट्याचे बोगस बियाणे विकल्याची तक्रार काटकरवाडी येथील वसंतराव निकम यांनी यांनी पंचायत समितीकडे केली होती. त्यानुसार बुधवारी (दि. २६) संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने निकम यांच्या शेतात बटाटा झाडे उपटून पाहणी केली व बियाणे बोगस असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मात्र, संबंधित शेतकऱ्यांचा व आपला काहीही संबंंध नसून, त्यांनी आपल्याकडून बटाटा बियाणे खरेदी केलेलेच नाही, असा दावा वैभव जाधव यांनी केला आहे. (प्रतिनिधी)खराब हवामानाचा फटकायावर्षी बटाटा पिकाला पोषक हवामान असले तरी या भागात पडणाऱ्या सततच्या पावसाने काही शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी कित्येक दिवस वाहत होते. त्यामुळे खराब हवामान, पाऊस याचा फटका बटाटा पिकाला बसला आहे. केवळ एखाद्याला नजरेसमोर ठेवून बेताल आरोप केल्याने जिल्ह्यासह इतर भागातील शेतकऱ्यांचा पुसेगाव बाजारपेठेवरचा विश्वास उडणार आहे. केवळ द्वेषापोटी एखाद्याला नाहक बदनाम करण्याचा हा प्रकार थांबणे गरजेचे आहे, असे बियाण्यांचे व्यापारी संतोष तारळकर यांनी म्हटले आहे. पुसेगाव बाजारपेठेतून बोगस बटाटा बियाणे विकले गेल्याच्या आरोपामुळे बाजारपेठेचे नाव बदनाम होण्यास वेळ लागणार नाही. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी गावातील व्यापारी संघटना वैभव जाधव यांच्या पाठीशी आहे. - प्रकाश नांगरे, बटाटा बियाणे व्यापारी
बटाटा बियाण्याचे व्यापारी एकवटले
By admin | Updated: November 28, 2014 23:53 IST