सातारा : स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी करंजे येथे सापळा रचून गुटखा विक्रीसाठी येणाऱ्या एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८४ हजार ७५६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
गुटखा विक्रीवर कायद्याने बंदी आहे. या परिस्थितीतच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना आपल्या खास बातमीदारामार्फत मोळाचा ओढा बाजूने एक व्यक्ती मोपेडवरून एका पोत्यामध्ये गुटखा घेऊन विक्रीकरिता जात आहे, अशी माहिती मिळाली. धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करंजे येथील महानुभाव मठाशेजारी सापळा लावला. संबंधित व्यक्ती मोपेडवरून पोते घेऊन निघाला होता. त्याला थांबवून तपासणी केली असता त्याच्याकडे असणाऱ्या पोत्यामध्ये हिरा पान मसाल्याचे ९० पुडे, रॉयल तंबाखूचे ८९ पुडे असा मुद्देमाल आढळून आला. याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, रमेश गरजे, आनंद सिंग साबळे, सहाय्यक फौजदार तानाजी माने, ज्योतीराम बर्गे, पोलीस हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, पोलीस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाने, पंकज मस्के यांनी ही कारवाई केली.