फलटण : ‘साखरवाडी येथील दत्त इंडिया साखर कारखाना साठ बेडचे कोरोना सेंटर उभे करणार आहे,’ अशी माहिती प्रशासकीय अधिकारी अजित जगताप यांनी दिली.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नाने दत्त इंडिया साखर कारखाना रिक्रिएशन क्लब साखरवाडी येथे लवकरच साठ बेडचे कोरोना सेंटर उभे राहणार आहे. साठ बेडचे कोरोना केअर सेंटर हे सर्व सोयीसुविधांयुक्त कोरोना केअर सेंटर असणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा या कामी पुरेशी ठरू शकत नाही.
कोरोना रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सोयी सुविधा देऊ शकत नाही. संकटकाळामध्ये फलटण तालुक्यातील साखरवाडीमधील मोठे व्यावसायिक, व्यापारी व आर्थिकदृष्ट्या सधन व्यक्तींनी पुढे येऊन प्रशासनास मदत करणे खूप गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार श्री दत्त इंडिया शुगर फॅक्टरी साखरवाडी स्वतःच्या जागेत ६० बेड उभे करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीचे काम जलद गतीने सुरू केले आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जितेंद्र जयकुमार, कारखाना प्रशासकीय अधिकारी अजित जगताप उपस्थित होते.