पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापुरातील प्रवीणकुमार पवार यांची पत्नी प्रीती यांचे एका राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते आहे. या खात्यावर ५७ हजार २८४ रुपये एवढी रक्कम होती. मंगळवार, दि. १४ रोजी प्रीती यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्यामध्ये तुमच्या खात्याचे केवायसी त्वरित अपडेट करा, असा संदेश होता. तसेच त्याखाली एक मोबाईल क्रमांक दिलेला होता. प्रवीणकुमार यांनी दुसऱ्यादिवशी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरील व्यक्तीने आपण बँकेचे एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे सांगून प्रवीणकुमार यांना त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार प्रवीणकुमार यांनी ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने एटीएम कार्डचा क्रमांक मागितला. प्रवीणकुमार यांनी तो क्रमांकही संबंधिताला दिला; मात्र दुसऱ्याचदिवशी खात्यातील ५७ हजारांची रक्कम काढून घेतली गेली असल्याचे प्रवीणकुमार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता ऑनलाईन पद्धतीने झारखंड येथून ही रक्कम काढण्यात आल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच प्रवीणकुमार पवार यांनी शुक्रवारी याबाबतची फिर्याद कऱ्हाड शहर पोलिसात दिली आहे.
बँक खात्यातील ५७ हजार ऑनलाईन लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:42 IST