लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जुलै महिन्याची १९ तारीख उजाडली तरी सातारा पालिकेच्या ४१३ कर्मचाऱ्यांना जून महिन्याचे वेतन अद्याप अदा झालेले नाही. हे वेतन तातडीने अदा न केल्यास पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा म्युनिसिपल कर्मचारी संघटनेने दिला आहे.
सातारा पालिकेत राज्य संवर्ग अ व ब कर्मचाऱ्यांची संख्या वगळता लिपिक व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या २३०च्या घरात आहे. दर महिन्याच्या एक ते सात तारखेच्या दरम्यान कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा होते. मात्र, जुलै महिन्याची १९ तारीख उजाडली तरी जून महिन्याचे वेतन खात्यात जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. वेतन नसल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांची आर्थिक चणचण वाढली असून, बँक हप्ते आणि इतर गरजांची अडचण झाली आहे.
पालिका कर्मचारी संघटनेने सोमवारी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिंपरी-चिंचवड उपायुक्त पदाच्या जबाबदारीमुळे ते उपलब्ध झाले नाहीत. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष गणेश दुबळे यांनी प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, त्यांनी वेतन अनुदान प्राप्त झाले नसल्याचे सांगत वेतनबिले कोषागार कार्यालयात जमा करण्यात आल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
फोटो : सातारा पालिका