सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला वर्ष होऊन गेले असून, आतापर्यंत १ लाख ३८ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक ३१ हजार रुग्णांची नोंद ही सातारा तालुक्यात झाली आहे. तसेच कोरोना बळींचा आकडाही साताऱ्यातच अधिक आहे, तर कऱ्हाड दुसऱ्या स्थानावर असून, २० हजारांजवळ बाधित सापडले आहेत. तसेच वाई, खटाव अन् फलटण तालुक्यांतील संख्या १० हजारांवर आहे, तर महाबळेश्वर तालुक्यात सर्वांत कमी प्रमाण आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. सुरुवातीला हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत रुग्ण सापडत होते. मात्र, जून महिन्यानंतर कोरोना रुग्णवाढीचा वेग झपाट्याने वाढला. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर दररोज कोरोनाचे रुग्ण ५०० ते ८००, ९०० दरम्यान वाढत होते. एका दिवसात हजार रुग्ण नोंद झाल्याचेही दिसून आले. पण, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोनावाढीचा वेग काहीसा मंदावला. कधी १००, २०० फारतर ३०० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळून आले. मात्र, फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. यामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, तर एप्रिल महिन्यापासून हजारात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अडीच हजारांवरही बाधित संख्या गेली. परिणामी सद्यस्थितीत एकूण रुग्णसंख्या दीड लाखांच्या जवळ पोहोचली आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत १ लाख ३८ हजार ६२० रुग्णसंख्या नोंद झाली आहे. यामधील ३०,९७९ कोरोना रुग्ण हे एका सातारा तालुक्यात नोंद झालेले आहेत, तर यानंतर कऱ्हाड तालुक्यातील बाधितांची संख्या १९,७०१ झालेली आहे. इतर तालुक्यांतही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, यामध्ये महाबळेश्वर तालुका पाठीमागे असून, यामुळे प्रशासनाला दिलासा आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच मृतांची संख्याही वाढत चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ३२५३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद ही सातारा तालुक्यातच झालेली आहे. यानंतर कऱ्हाड तालुक्याचा क्रमांक लागतो.
चौकट :
तालुकानिहाय नोंद कोरोना आकडेवारी
तालुका बाधित मृत
सातारा - ३०,९७९ ९२६
कऱ्हाड - १९,७०१ ५७३
फलटण - १८,७८३ २३३
कोरेगाव - ११,८२७ २८२
वाई - १०,२३२ २७३
खटाव - १२,३०८ ३४३
खंडाळा - ८,५४२ ११३
जावळी - ६,५८१ १४४
माण - ९,३३५ १८३
पाटण - ५,७२७ १४२
महाबळेश्वर - ३,७६४ ४१
इतर - ८४१ ...
.....................................................