सातारा : सातारा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंढे येथे छापा घालून टँकरसह २५ हजार लिटर स्पिरीट व साहित्य असा ३१ लाख ८२ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नंदू जर्नादन साळुंखे याला अटक केली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांनी दिली आहे.२९ डिसेंबर २०१४ रोजी भरारी पथकाने मुंढे येथे बनावट दारू वाहतूक करीत असताना इंडिका गाडीसह दोघांना अटक केली आहे. त्या प्रकारची बनावट दारू अन्य ठिकाणी वितरित होते किंवा तयार होते का, त्याबाबत तपास करण्यासाठी रात्रगस्त वाढविण्यात आली होती. गुरुवारी (दि. ८ जानेवारी) रोजी पहाटे तीन वाजता मुंढे, ता. कऱ्हाड येथे सर्व्हिस रोडला टँकर घेऊन त्यातून स्पिरीट काढून घेत असताना टँकरचालक नंदू जर्नादन साळुंखे (रा. तिरखेडा शिवार, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) यास अटक करण्यात आली.स्पिरीट काढून घेणारा आणखी एकजण जयवंत ऊर्फ नाना आनंदा पवार (रा. पाडळी केसे, ता. कऱ्हाड) हा फरारी झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विनोद इंजे करीत आहेत. अशा बनावट मद्यापासून अनर्थ घडू नये म्हणून शासनाच्या अधिकृत दुकान व बिअरबारमधूनच मद्य खरेदी करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात येत आहे. बनावट दारु विक्री रोखण्यासाठी छापासत्र राबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व्ही. डी. टिकोळे, उपनिरीक्षक सतीश काळभोर, प्रवीण शेलार, दीपक सुपे, उत्तम सावंत, उपनिरीक्षक बी. एल. येळे, विनोद बनसोडे, वाहनचालक सचिन जाधव आदींच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)
मुंढे येथे छापा घालून टँकरसह २५ हजार लिटर स्पिरीट व साहित्य असा ३१ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त
By admin | Updated: January 10, 2015 00:13 IST