ऑनलाईन लोकमत
सातारा, दि. 11 - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साता-यातील भरतगाव येथे कंटेनर आणि कारची धडक झाली. या अपघातामुळे दोन्ही वाहनांना आग लागली. यामुळे कंटेनरमधील नवीन 25 दुचाकी जळून खाक झाल्या. या घटनेत जवळपास कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा अपघात गुरुवारी (11 मे) सकाळी झाला.
पुण्याहून कंटेनर कोल्हापूरकडे निघाला होता. या कंटनेरमध्ये सुमारे 25 दुचाकी होत्या. भरतगावाजवळ आल्यानंतर कार आणि कंटेनरची धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. आग लागल्याचे निदर्शनास येताच कार आणि कंटेनरमधील चालकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर उड्या मारल्या. सुदैवानं दोघंही बचावले.
काहीक्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. पाहता-पाहता कंटेनर, कार आणि कंटेनरमधील सर्व दुचाकी अक्षरश: जळून खाक झाल्या. या अपघातामुळे महामार्गावर अग्नितांडव निर्माण झाले होते.
अखेर काही वेळानंतर सातारा पालिका आणि शेंद्रे येथील अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत कार, कंटेनर आणि कंटेनरमधील दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.