लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना महामारीमुळे परीक्षेत मुक्तहस्ते दिलेले गुण, इयर ड्रॉपचा विद्यार्थ्यांनी घेतलेला निर्णय यांसह परदेशात जाऊन अद्ययावत शिक्षण घेण्याची आस यांमुळे यंदा एमबीबीएस आणि बीडीएसच्या अभ्यासक्रमात जागा अद्यापही रिक्त आहेत. शिल्लक राहिलेल्या सर्व जागांवर डोनेशनशिवाय प्रवेश देण्यात येणार असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना उत्तम करिअरची संधी मिळणार आहे.
महागडा आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर समजला जाणारा एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रम सामान्यांच्या आवाक्यात येत आहे. देशात २२४ महाविद्यालयांत तब्बल दोन हजार ४६३ जागा अद्यापही रिक्त आहेत. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आता निव्वळ शैक्षणिक शुल्क भरावे लागणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकतेच देशभरातील एमबीबीएस आणि बीडीएसच्या रिक्त जागेबाबत माहिती प्रसारित केली आहे.
महाराष्ट्रातील १९ महाविद्यालयांत बीडीएस आणि एमबीबीएसच्या ३३२ जागा अद्यापही रिक्त आहेत. यात एमबीबीएससाठी सांगली, मुंबई, कोल्हापूर, लोणी, कऱ्हाड, वर्धा, पुणे येथील महाविद्यालयांचा समावेश आहे. रिक्त जागांमध्ये एमबीबीएसच्या एनआरआय कोट्यामधील जागांचा समावेश सर्वाधिक आहे. यातील काही जागा एआयआयएमएस व जेआयपीएमइआर सारख्या केंद्रीय संस्थांमध्येही आहेत.
चौकट :
मर्सिफॅक्टर रिझल्ट
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवायला मर्यादा होत्या. परिणामी उत्तरपत्रिका तपासताना सढळ हाताने गुण देण्यात आले. यालाच शैक्षणिक क्षेत्रात मर्सिफॅक्टर रिझल्ट असेही म्हणतात. या निकालामुळे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच अन्य शाखांमध्ये विद्यार्थ्यांना जाण्याची संधी उपलब्ध झाली. कोट्यवधी रुपये खर्च करून वैद्यकीय क्षेत्रापेक्षा अवकाश अभियंत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला असल्याचे दिसते.
परदेशात जाण्यासाठी अभ्यासक्रम कुचकामी
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ज्यांना परदेशात जाण्याची इच्छा असते, त्यांच्यासाठी भारतीय अभ्यासक्रम कुचकामी असतो असं मत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून भारतात आठ वर्षे अभ्यास पूर्ण केल्यानंतर परदेशात जाऊन पुन्हा लाखो रुपये खर्च करून दोन वर्षे अभ्यास करावा लागतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता यंदा परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयर ड्रॉप घेऊन उत्तम गुण मिळवून परदेशात प्रवेश घेण्याची तयारी दाखविली आहे.