सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीने गेल्या आठवड्यापासून पुन्हा डोके वर काढले आहे. शनिवारी चोवीस तासांत तब्बल १८६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत.
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा कहर होऊ लागल्याने जिल्हावासीयांसाठी धोक्याची घंटा जाणवू लागलेली आहे. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनावरचा ताण वाढू लागलेला आहे. शुक्रवारी जिल्ह्यामध्ये १ हजार ३९३ स्वॅबची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८६ जण बाधित आढळून आले आहेत. शासकीय रुग्णालयात ७४१ स्वॅब तपासण्यात आले, त्यामध्ये १५५ जण कोरोनाबाधित आढळले. खासगी रुग्णालयामध्ये १५१ स्वॅब तपासले त्यामध्ये १४ जण बाधित आढळले. ८९१ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या त्यामध्ये १६९ बाधित आढळले. ५०२ जणांचे रॅट तपासणी केली, त्यामध्ये १७ जण पॉझिटिव्ह आले.
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने प्रशासनाची पळापळ सुरू झालेली आहे. प्रशासनाकडून वारंवार योग्य सामाजिक अंतर राखावे, तसेच मास्कचा वापर करण्याबाबत वारंवार सांगितले जात आहे. मास्क न वापरणारे, तसेच गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया सुरू आहेत, तरीदेखील लोक गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र असल्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागलेला आहे.
आयसीयू बेड मिळेनात
जे रुग्ण कोरोना झाल्याने अत्यवस्थ झाले आहेत, त्यांच्यावर साताऱ्यातील कोविड जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते. बाधितांची संख्या वाढून या हॉस्पिटलमधील बेडदेखील कमी पडू लागलेले आहेत. आयसीयूमध्ये बेड मिळावेत, यासाठी सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, पत्रकार यांच्याशी संपर्क साधून लोक प्रशासनापर्यंत आपली व्यथा मांडत आहेत.