वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी दाणादाण उडविली. या पावसात सुमारे शंभर झाडे उन्मळून पडली तर विजेचे १४ खांब वाकले. अनेक ठिकाणी पत्रे उडून गेले तर कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.वरकुटे मलवडी परिसरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेने हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत बुधवारी सायंकाळी वरकुटे मलवडीसह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.वादळी वाऱ्यामुळे दामोदर पिसे, पांडुरंग ढेरे, महादेव ढेरे, राजेंद्र काटकर यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेले. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जनावरांसाठी केलेल्या शेडवरील पत्रे उडून गेले. ढेरे वस्तीनजीक दामोदर पिसे यांच्या घरावरील पत्रा उडून खांबावरील तारेवर पडला. याच परिसरात तब्बल १४ विजेचे खांब वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे वाकले.पाटलूच्या वस्तीवरील शेतकरी बबन आटपाडकर यांचा २५० क्विंटल, भिवा आटपाडकर यांचा १२५, बापू आटपाडकर यांचा १७०, पोपट आटपाडकर यांचा ८०, शहाजी आटपाडकर १७०, पोपट कुंभार ८०, विलास तोडकर ६०, पोपट आटपाडकर ४०० तर सुभाष आटपाडकर यांच्या सुमारे २० क्विंटल कांद्याचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी कांद्याला दर नाही म्हणून कांदा अडी लावून ठेवला होता. मात्र, पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. (वार्ताहर)
शंभर झाडे उन्मळली; विजेचे १४ खांब वाकले
By admin | Updated: May 20, 2016 00:03 IST