सांगली : जिल्हा परिषद पदाधिकारी बदल सव्वावर्षानंतर करण्याचे भाजप नेत्यांनी निश्चित केले होते; पण महापालिकेत भाजपच्या सत्तेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरुंग लावल्यामुळे जिल्हा परिषदेत भाजप नेत्यांनी पदाधिकारी न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यमान जि. प. पदाधिकाऱ्यांनाच पूर्ण अडीच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. भाजपच्या या भूमिकेचा निषेध करून दरीबडची (ता. जत) गटातील सरदार पाटील आणि अंकलखोप (ता. पलूस) गटातील नितीन नवले यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेत दीड वर्षापूर्वी पदाधिकारी बदलावेळी इच्छुकांची मोठी गर्दी होती. यावेळी भाजपच्या कोअर कमिटीने सव्वावर्षानंतर पदाधिकारी बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पदाधिकारी बदलावेत, अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील, अरुण बालटे, सरदार पाटील, नितीन नवले, सुरेंद्र वाळवेकर, अश्विनी पाटील, सरिता कोरबू यांनी भाजप नेत्यांकडे पदाधिकारी बदलासाठी दबाव टाकला होता. खासदार संजयकाका पाटील यांनीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे जि. प. पदाधिकारी बदलावेत, अशी मागणी केली होती. भाजप नेत्यांच्या बैठकाही झाल्या; पण बहुतांशी भाजप नेत्यांनी महापालिकेत भाजपची सत्ता गेली असून, जिल्हा परिषदेत गडबड होण्याची शक्यता आहे, यामुळे पदाधिकारी बदल करू नये, अशीच चंद्रकांत पाटील यांच्याकडे भूमिका मांडली होती. तोपर्यंत मार्च २०२१ पासून कोरोनाचा फैलावही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पदाधिकारी बदलाच्या हालचाली थांबल्या होत्या. अखेर मागील आठवड्यात भाजप नेत्यांनी जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल करायचाच नाही. विद्यमान पदाधिकारीच पूर्ण कार्यकाल कामकाज करतील, असे निश्चित केले आहे. भाजपच्या नेत्यांच्या या भूमिकेवर भाजपमधील इच्छुक सदस्य नाराज झाले आहेत. भाजपच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाहीच, पण अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे भाजपमधील अनेक जि. प. सदस्य भाजपच्या वाटेवर आहेत. त्यापैकी सरदार पाटील, नितीन नवले यांनी भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यांना पक्षात घेण्याच्या दृष्टीने दोन बैठका सांगलीत घेतल्या आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी होताच भाजपचे दोन सदस्य काँग्रेसमध्ये जाणार आहेत. याशिवाय, जत तालुक्यातील अन्य तीन सदस्यांपैकी एक काँग्रेस आणि दोन राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. मिरज तालुक्यातील भाजपमध्येही मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत.
चौकट
आता बदल नकोच
जिल्हा परिषदेतील भाजपचे अनेक सदस्य नेते आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर नाराज आहेत. पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सदस्यांनीही आता पदाधिकारी बदल करूच नका, अशी भूमिका घेतली आहे.