सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा परिषदेने कॉल सेंटर पुन्हा कार्यान्वित केले आहे. याद्वारे रुग्णांना तत्काळ बेड मिळण्यासाठी मदत होणार आहे. गरजू रुग्णांनी ०२३३-२३७४९०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले आहे.
कोरे म्हणाल्या की, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत कोरोना लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत आहे. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस टोचून घ्यावी. लसीकरण झालेली व्यक्ती व इतरांनी गर्दी टाळावी. बेड मिळण्यासाठी २३७७९०० व २३७८९०० या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.
डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेतील हे कॉल सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यरत होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने त्यावरील ताण कमी झाला होता. आता जिल्ह्यात दररोज सरासरी २०० ते ३०० रुग्ण सापडू लागल्याने कॉल सेंटर पुन्हा कार्यान्वित केल्याचे कोरे म्हणाल्या.