लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : पाऊस एकीकडे आणि पर्जन्यमान मापक यंत्र व सॅटेलाईट यंत्रणा दुसरीकडे, अशी अवस्था चरण मंडळमध्ये झाली आहे. यामुळे नोंद कमी झाली. तर पावसाचा आगार असणाऱ्या चरण मंडलमध्ये रेंज नसल्याने चक्क शून्य मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
या अगोदर मंडलनिहाय संबंधित अधिकारी अथवा तेथील कर्मचारी पावसाची नोंद घेत होता. आता आधुनिकीकरण आले. यामध्ये मंडलनिहाय नोंदी ऑनलाईनच संबंधित विभागास मिळतात. शुक्रवार दि. १८ रोजी चरण या पावसाचा आगार असणाऱ्या ठिकाणी चक्क शून्य मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कारण पावसाची नोंद आली त्यावेळी येथे रेंज नव्हती. त्यामुळे पडलेल्या पावसाची नोंद आली नाही.
काही दिवसांपूर्वी तालुक्याच्या उत्तर भागात ढगफुटी सदृश पाऊस व वादळ झाले. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. हा पाऊस आणि वारा डोंगरमाथ्यावरून खाली वेगात आला. कधी पडला नसेल एवढा पाऊस तासात पडला मात्र पर्जन्यमान मापक यंत्राने १२ मिलिमीटर पावसाची नोंद दाखवली होती. पाऊस एकीकडे आणि पर्जन्यमान मापक यंत्र व सॅटेलाईट यंत्रणा दुसरीकडे यामुळे नोंद कमी झाली होती.