आटपाडी : आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटील वाडी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेंतर्गत झालेल्या रस्ते कामात ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य माणिक तळे यांनी केला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
य. पा. वाडीतील तळे वस्तीकडे जाणारा रस्ता जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून झाला आहे. करगणीतील श्री राम मजूर सहकारी सोसायटीने हे काम केले आहे. एकूण चार लाख रुपये या रस्त्यावर खर्च केले असून खडीकरण व एक पूल बनवताना १० सिमेंट पाइप टाकण्याचे काम होते. मात्र ठेकेदाराने पूल करताना फक्त दोनच सिमेंट पाइप टाकले आहेत. तळे वस्ती येथील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन काम मंजूर आराखड्याप्रमाणे होत नसल्याबाबत तक्रार दिली होती.
या कामात ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला आहे, असा आराेप माणिक तळे यांनी केला आहे.
काेट
प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करत कामाचे मूल्यांकन करून जेवढे काम केले गेले आहे तेवढेच बिल अदा करावे, अशी मागणी केली होती. मात्र अधिकारी व ठेकेदाराने शासनाची फसवणूक करत जनतेच्या पैशावर डल्ला मारला आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार संस्थेची चौकशी करून त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.
- माणिक तळे,
ग्रामपंचायत सदस्य, य.पा. वाडी