विटा : बैलाने शिंग मारल्याने जखमी झालेल्या महिला रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टर वेळेत न आल्याने संतप्त झालेल्या सुमारे २० ते २५ तरुणांनी विटा येथील खानापूर रस्त्यावर असलेल्या डॉ. अविनाश लोखंडे यांच्या श्री साई रुग्णालयावर प्रचंड दगडफेक केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून, या हल्ल्यात रुग्णालयाचे सुमारे लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ ते पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.विटा येथील अमर शितोळे यांच्या आई सुमन या गोठ्यात काम करीत असताना त्यांना बैलाने शिंग मारल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने प्रथम डॉ. बंडगर यांच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून डॉ. लोखंडे यांच्या श्री साई रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु, तेथे डॉ. लोखंडे नसल्याने डॉ. सुवर्णा लोखंडे यांनी सुमन यांना दाखल करून घेतले. त्यावेळी अमर शितोळे यांनी डॉक्टरांना तातडीने बोलावून घेऊन उपचार सुरू करा, अशी विनंती डॉ. सुवर्णा लोखंडे यांना केली.त्यावेळी डॉ. लोखंडे पाच मिनिटांत येत असल्याचे सांगण्यात आले. परंतु, अर्धा ते पाऊण तास झाला तरी डॉ. लोखंडे आले नाहीत. त्यामुळे अमर शितोळे यांनी आई सुमन यांना डॉ. रणजितसिंह जाधव यांच्या पंकज रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू केले. श्री साई रुग्णालयाचे डॉ. लोखंडे हे वेळेत न आल्याचा राग मनात धरून शहरातील सुमारे २० ते २५ तरुणांनी खानापूर रस्त्यावरील डॉ. लोखंडे यांच्या रुग्णालयाकडे धाव घेऊन रुग्णालयावर प्रचंड दगडफेक केली. (पान १० वर)
साई रुग्णालयावर तरुणांची दगडफेक
By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST