लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर-बहे रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीच्या पुढे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात २७ वर्षीय युवक ठार झाला, तर त्याची पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. हा अपघात सायंकाळी ६ च्या सुमारास झाला. अपघातातील दुसऱ्या दुचाकीवरील युवकही जखमी झाला आहे.
संतोष शिवाजी थोरात (वय २७, मूळ रा. वशी, ता. वाळवा, सध्या इचलकरंजी) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे, तर त्याची पत्नी दर्शना (वय २२) ही किरकोळ जखमी झाली आहे. दुसऱ्या दुचाकीवरील सिद्धांत संग्राम पाटील (वय १९, रा. कोळे, ता. वाळवा) हाही जखमी झाला आहे.
संतोष आणि दर्शना हे दोघे दुचाकीवरून (एमएच ०९ इपी २७२९) बहे येथून इस्लामपूरकडे येत होते, तर सिद्धांत पाटील हा त्याच्या दुचाकीवरून (एमएच १० क्यू ३९२९) इस्लामपूरहून बहेस निघाला होता. औद्योगिक वसाहतीच्या पुढे असणाऱ्या उतारावर या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात संतोष हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच त्याला खासगी रुग्णवाहिकेतून शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. रुग्णालय सूत्रांनी घटनेची माहिती पोलिसांत दिली आहे.
अवघ्या सव्वा महिन्यांपूर्वी लग्न..!
अपघातात ठार झालेला वशी येथील संतोष आणि इस्लामपूर येथील दर्शना यांचा अवघ्या सव्वा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. संतोष हा आज सासूरवाडीत आला होता. संतोष पत्नी दर्शना हिच्यासमवेत बहे येथील रामलिंग बेट परिसरात फिरण्यासाठी गेला होता. तेथून परतत असताना ही घटना घडली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. नवदाम्पत्याच्या अंगावरील हळद निघण्यापूर्वीच घडलेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबे दुःखाच्या खाईत लोटली गेली होती.